झेडपीच्या विद्यार्थिनीनी पाहिला ‘पॅडमॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 22:13 IST2018-03-30T22:13:05+5:302018-03-30T22:13:05+5:30

समाजात मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत जनजागृती व त्याबद्दल असलेले गैरसमज दूर करण्यासाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील साडेतीन हजार किशोरवयीन विद्यार्थिनीना ‘पॅडमॅन’ हा चित्रपट जिल्ह्यातील ......

Zadpi girl saw 'Padman' | झेडपीच्या विद्यार्थिनीनी पाहिला ‘पॅडमॅन’

झेडपीच्या विद्यार्थिनीनी पाहिला ‘पॅडमॅन’

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचा उपक्रम : चित्रपटातून जनजागृती

ऑनलाईन लोकमत
गोंदिया : समाजात मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत जनजागृती व त्याबद्दल असलेले गैरसमज दूर करण्यासाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील साडेतीन हजार किशोरवयीन विद्यार्थिनीना ‘पॅडमॅन’ हा चित्रपट जिल्ह्यातील विविध चित्रपट गृहांमध्ये दाखविण्यात येणार आहे. आमगाव येथून या उपक्रमाला शुक्रवारी (दि.३०) सकाळी ९ वाजता सुरूवात करण्यात आली.
मासिक पाळी ही नैसर्गिक क्रिया आहे. मात्र ग्रामीण भागात याविषयी अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे महिला व मुलींची बरेचदा कुचंबना होते. शिवाय आरोग्यविषयक अज्ञानामुळे, स्वच्छतेचा संदेश योग्यवेळी न पोहोचल्याने अनेक युवतींना विविध आजारांना सामोरे जावे लागते. मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत जनजागृती करून महिला व मुलींची कुचंबना थांबविता यावी. यासाठी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या मार्गदर्शनात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), शिक्षण विभाग आणि उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना पॅडमॅन चित्रपट दाखविण्यात येत आहे. विशेष म्हणजे राज्य शासनाने ग्रामीण भागातील महिलांसाठी तसेच जिल्हा परिषद शाळेतील ११ ते १९ वर्षे वयोगटातील मुलींसाठी माफक दरात सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्यासाठी ८ मार्च २०१८ पासून ‘अस्मिता’ योजनेला सुरूवात केली आहे. विद्यार्थिनीना पॅडमॅन चित्रपट दाखविण्यामागे मासिक पाळी व्यवस्थापन, सॅनिटरी नॅपकिन वापरण्याबाबत जनजागृती होईल हा या मागील शासनाचा उद्देश आहे. दरम्यान जिल्ह्यातील ११३ जिल्हा परिषदेच्या शाळांतील सुमारे तीन हजार ३८२ विद्यार्थिनींना पॅडमॅन हा चित्रपट दाखविण्यात आला.
आमगाव येथील चित्रपटगृहात आमगाव, सालेकसा व देवरी तालुक्यातील ३४ शाळांतील ८१० विद्यार्थिनींना ३० व ३१ मार्च रोजी सकाळी ९ ते १२ दरम्यान चित्रपट पाहता येणार आहे. तिरोडा येथील चित्रपटगृहात तालुक्यातील १७ शाळांतील ७९० विद्यार्थिनींना ३१ मार्च, तसेच १ व २ एप्रिल रोजी सकाळी ९ ते १२ च्या दरम्यान चित्रपट पाहता येणार आहे.
तर गोंदिया येथील चित्रपट गृहात ६ ते ९ एप्रिलदरम्यान सकाळी ९ ते १२ या वेळात गोंदिया, अर्जुनी-मोरगाव, गोरेगाव व सडक-अर्जुनी तालुक्यातील सुमारे ६२ शाळांतील १७८२ विद्यार्थिनींना चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
विद्यार्थिनीनीसाठी वाहनाची सोय
विद्यार्थिनीना ये-जा करण्यासाठी परिवहनाच्या व्यवस्थेसह विद्यार्थ्यांसोबत एका महिला शिक्षिकेची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक निर्देश पंचायत समित्यांना देण्यात आले असल्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, उमेद अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक अनिल गुंजे यांनी सांगितले. अभियानाच्या यशस्वितेसाठी स्वच्छ भारत मिशनचे माहिती, शिक्षण व संवाद तज्ज्ञ अतुल गजभिये, सर्वशिक्षा अभियानाचे जिल्हा समन्वयक (मुलींचे शिक्षण) बाळकृष्ण बिसेन, उमेदचे स्वप्नील अग्रवाल सहकार्य करीत आहेत.
मुकाअ यांची चित्रपटगृहाला भेट
जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी शुक्रवारी (दि.३०) आमगाव येथील सोना चित्रपटगृहाला भेट देऊन विद्यार्थ्यांसह चर्चा केली. दरम्यान विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयीं सुविधांची माहिती घेत त्यांनी जिल्ह्यातील सर्वच विद्यार्थिनींनी ‘पॅडमॅन’ चित्रपट पाहण्याचे आवाहन केले.

Web Title: Zadpi girl saw 'Padman'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.