युवकांनो, देशाची सेवा करा

By Admin | Updated: May 28, 2015 01:17 IST2015-05-28T01:17:44+5:302015-05-28T01:17:44+5:30

शिक्षण घेत असताना युवक-युवतींचे लक्ष भविष्यात डॉक्टर, इंजिनिअर व वकील होण्याचे असते.

Youths, serve the country | युवकांनो, देशाची सेवा करा

युवकांनो, देशाची सेवा करा

जिल्हाधिकारी सूर्यवंशी : सैन्यदलातील हवालदार अशोक वरकडे यांचा सत्कार
गोंदिया : शिक्षण घेत असताना युवक-युवतींचे लक्ष भविष्यात डॉक्टर, इंजिनिअर व वकील होण्याचे असते. युवक-युवतींनी चांगले शिक्षण घेऊन भारतीय सैन्यात अधिकारी होऊन देशाची सेवा करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.
जिल्हाधिकारी यांच्या कक्षात भारतीय सैन्यात अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्यातील शेंडा येथील रहिवासी भारतीय सैन्यातील हवालदार अशोक वरकडे यांचा सोमवारी हृद्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. या वेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले, जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक देशाच्या सेवेसाठी सैन्यातील विविध पदावर दिसायला हवे. यासाठी शालेय जीवनापासून त्यांच्यामध्ये देशभक्तीची भावना जागृत व्हावी आणि तो जबाबदार नागरिक व्हावा. यासाठी जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर मुख्याध्यापक व शिक्षकांची कार्यशाळा घेण्यात येईल. या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून भारतीय सैन्यातील विविध पदावर जाऊन देशसेवा करण्याबाबत त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करण्याचे काम मुख्याध्यापक व शिक्षकांच्या माध्यमातून करण्यात येईल. जिल्ह्यातील युवा वर्ग भारतीत सेनेत न जाण्यामागचे कारण त्यांच्यामध्ये याबाबत माहितीचा अभाव आहे, असे ते म्हणाले.
जिल्ह्यातील शाळांमध्ये दर आठवड्याला शुक्रवार किंवा शनिवारी विद्यार्थ्यांच्या शारीरिक कवायती घेण्यात येतील. सैन्यातून निवृत्त झालेले सैनिक हे ज्या गावामध्ये असतील त्या गावातील शाळेमधील विद्यार्थ्यांना शारीरिक कवायती शिकवतील. त्यामुळे विद्यार्थी तंदुरुस्त राहून भविष्यात भारतीय सैन्यात विविध पदावर जाण्याची तयारी करतील, असेही ते म्हणाले.
हवालदार अशोक वरखडे यांच्या अतुलनीय कामगिरीसाठी त्यांचा शाल, श्रीफळ आणि पाच लाख रुपयांचा धनादेश देऊन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच नायक तथा जिल्हाधिकारी यांचे वाहन चालक नरेंद्र तिवारी यांना माजी सैनिक पाल्यांच्या शिष्यवृत्तीसाठी १० हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
सदर कार्यक्रमाला सैनिक कल्याण संघटक सुभेदार मेजर जगदीश रंगारी, योगेश बिसेन, माजी सैनिक बहुउद्देशिय संस्थेचे प्रल्हाद बघेले, येनाथ राव, टेकेश्वर पटले, आनंदराव लांजेवार, हरिचंद कटरे, पांडुरंग सुरणकर, योगराज ठाकरे, पवनलाल बिसेन आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
हवालदार अशोक वरखडे यांची कामगिरी
हवालदार अशोक वरकडे हे १९९७ मध्ये पॅराशूट रेजिमेंटमधून भरती झाले. त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने दक्षिण सुदान या देशामध्ये जुलै २०११ ते फेब्रुवारी २०१२ या काळात सेवा केली. १७ आॅगस्ट २०१३ च्या एका प्रसंगात अरुणाचल प्रदेशातील मुलोंग पहर क्षेत्रात कार्यरत असताना दोन आतंकवाद्यांनी वरकडेंच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. वरकडे यांनी बचावात्मक पवित्रा घेऊन स्वत:च्या जीवाची पर्वा न करता दोन आतंकवाद्यांपैकी एकाला ठार केले, तर दुसरा जखमी होऊन पळाला. हवालदार वरकडे यांनी दाखवलेल्या अतुलनीय धाडसामुळे व दृढ निश्चयामुळे आतंकवाद्याला ठार मारण्यात ते यशस्वी ठरले. त्यांनी दाखवलेल्या बहादुरीसाठी भारत सरकारतर्फे वरकडे यांना सेवा मेडल देऊन गौरविण्यात आले. राज्य शासनानेसुद्धा त्यांच्या या अतुलनीय शौर्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या हस्ते अशोक वरकडे यांना सन्मानित केले.
विद्यार्थ्यांसाठी नवीन उपक्रम
गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक शाळांमध्ये दर आठवड्याला शुक्रवार किंवा शनिवारी विद्यार्थ्यांच्या शारीरिक कवायती घेण्यात येणार आहेत. सैन्यातून निवृत्त झालेले सैनिक हे ज्या गावामध्ये असतील त्या गावातील शाळेमधील विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून शारीरिक कवायती शिकविण्यात येतील. त्यामुळे प्रत्येक गावातील विद्यार्थ्यांचे शारीरिक आरोग्य उत्तम राहू शकेल व ते देशसेवेकडे आकर्षित होतील, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

Web Title: Youths, serve the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.