तालुक्यातील युवकाची इस्रोत भरारी
By Admin | Updated: February 23, 2017 00:29 IST2017-02-23T00:29:39+5:302017-02-23T00:29:39+5:30
तालुक्यातील बेरडीपार (खुर्शीपार) येथील रोशन भक्तप्रल्हाद टेंभरे या युवकाची नुकतीच इस्रोत निवड झाली आहे.

तालुक्यातील युवकाची इस्रोत भरारी
वडेगावच्या शाळेत शिक्षण : होतकरूंना मार्गदर्शन व देशकार्य करण्याची इच्छा
तिरोडा : तालुक्यातील बेरडीपार (खुर्शीपार) येथील रोशन भक्तप्रल्हाद टेंभरे या युवकाची नुकतीच इस्रोत निवड झाली आहे. त्याने आपल्या गावातील होतकरु तरुणांना मार्गदर्शन व प्रसंगी आर्थिक मदत तसेच देशासाठी कार्य करण्याची इच्छा बोलून दाखविली.
भारतामध्ये इसरो ही नामांकित संघटना (इंडियन स्पेश रिसर्च आॅरगनायझेशन) भारतीय अवकाश संशोधन संघटना आहे. रोशनचे बालपण खेड्यातच गेले. त्याचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण त्यांच्या स्वगावी पूर्व माध्यमिक शाळा बेरडीपार येथे तर आठवी ते दहावीपर्यंत भिवरामजी विद्यालय वडेगाव येथे शिक्षण घेतले. दहावीला ७६ टक्के गुण घेवून उत्तीर्ण झाला. अकरावीला भिवरामजी ज्यु. कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. बारावीमध्ये ५६ टक्के गुण घेवून उत्तीर्ण झाला. घरच्या गरिबीच्या परिस्थितीची जाणीव असल्याने समोरील शिक्षणाकडे न वळता आयटीआयला जाण्याचा निर्णय घेतला. ड्रॉप्समन मेकॅनिक या दोन वर्षीय ट्रेडसाठी गोंदियात प्रवेश घेतला व उत्कृष्टरित्या अभ्यास करुन उत्तीर्ण झाला. त्यानंतर एक वर्ष मेगल न्युमेटिक प्रायव्हेट लिमिटेड नागपूर येथे अप्रेंटिशिप केले.
याच काळात इसरोची ड्रॉप्समन टेक्नीशियनसाठी जाहिरात निघाली. संपूर्ण भारतातून सात जागा होत्या. त्यात ३ सर्वसाधारण, २ इतर मागासवर्ग व २ अनुसूचित जातीकरिता राखीव होते. लेखी स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. त्यात रोशन ओबीसी गटातून भारतातून प्रथम तर सर्वसाधारण गटातून द्वितीय आला. त्यामुळे सर्वसाधारण प्रर्वगातून निवड करण्यात आली. रोशनने समोरील शिक्षण चालूच ठेवून घेवून स्वत: वैज्ञानिक बणण्याचे ध्येय्य बोलून दाखविले.
रोशनचे आई-वडील शेतमजुरी करीत असून फक्त दीड एकर शेती असल्याचे सांगितले. तीन बहिणी असून त्यांचेही सहकार्य मिळत असते. हे माझे सौभाग्य आहे की माझी निवड झाली. मी तिथे गेलो आणि रॉकेटद्वारे १०४ उपग्रहांचे अंतराळात प्रक्षेपण करण्यात आले. त्यात युएसए ९६, भारत ३, इस्राईल -१, कजाकीस्थान १, स्वीझरलेंड १, युएई १, नेदरलैंड १ असे १०४ उपग्रह अंतराळात पाठविले. त्यावेळी आम्ही वैज्ञानिकसह बंगलोरला पडद्यावर लाईव्ह प्रक्षेपण बघत होतो. सुरुवातीला कठीण वाटत होते. इंग्रजी व कन्नड भाषेचा वापर होतो. ती भाषा आता मी शिकत आहे.
माझ्या गावातील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन करणार. स्पर्धा परीक्षेसाठी, जाण्यासाठी, पुस्तकांसाठी प्रसंगी आर्थिक मदतसुद्धा करणार. लहाणपणीच फार मोठे व्हायचे असे वाटायचे, पण नेमके काय व्हायचे हे ठरविले नव्हते. पण जसजसा मोठा झालो तसतशी इच्छा जागृत होवून त्या दृष्टीने प्रयत्न केले. त्यासाठी भिवरामजी विद्यालय वडेगाव येथील प्राचार्य व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
त्याने निवडीचे श्रेय आई प्रमिला, वडील भक्तप्रल्हाद टेंभरे, आयटीआयचे शिक्षक, भिवरामजी विद्यालय वडेगाव येथील प्राचार्य व शिक्षक तसेच पूर्व माध्यमिक शाळा बेरडीपार येथील शिक्षकांना दिले आहे. निवडीबद्दल सतत मेहनत, चिकाटी व अभ्यास कामात आले असून खेड्यातील युवक सुद्धा आपली प्रगती करु शकतात. त्यासाठी युवकांनी आत्मविश्वास निर्माण करुन आपली स्वत:ची प्रगती करावी, असे आवाहन सुद्धा रोशन भक्तप्रल्हाद टेंभरे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
शाळेत झालेल्या सत्काराने मन भारावले
नियुक्तीच्या ठिकाणी सेटेलाईटचे (उपग्रहाचे) लहानलहान भाग व असेंबल, जोडणीचे ड्रार्इंग काढणे, मॉडेल बनविणे, त्यांची हालचाल करवून प्रत्यक्षात पाहणे, जोडणी करुन काम करेल किंवा नाही याबाबत तपासणी करणे, हे कार्य करावे लागत आहे. माझी नियुक्ती २७ डिसेंबर २०१७ ला बँगलोर येथील इसरोमध्ये झाली असून पहिला पगार झाला. त्यात घरी आई-वडिलांना देवून त्यातील पैशानेच मिठाई खरेदी करुन मी माझ्या गुरुजनांना मिठाई देवून गोड बातमी दिली. शाळेच्या वतीने केलेल्या सत्काराने मन भारावून गेल्याचे तो म्हणाला.