युवकांनी साधनांचा सदुपयोग करावा

By Admin | Updated: March 17, 2016 02:31 IST2016-03-17T02:31:01+5:302016-03-17T02:31:01+5:30

युवा शक्तींनी आपला अमूल्य वेळ वाया न घालवता विविध साधनांचा सदुपयोग करण्यासाठी वापर करावा.

The youth should utilize the tools | युवकांनी साधनांचा सदुपयोग करावा

युवकांनी साधनांचा सदुपयोग करावा

सविता पुराम : सालेकसा येथे पडोस युवा संसद कार्यक्रम
सालेकसा : युवा शक्तींनी आपला अमूल्य वेळ वाया न घालवता विविध साधनांचा सदुपयोग करण्यासाठी वापर करावा. वेळेची किमत समजून आपले करिअर घडविण्यासाठी व समाजहितासाठी आपली युवा शक्ती वापरावी, असे आवाहन जि.प.च्या माजी बालकल्याण सभापती सविता संजय पुराम यांनी केले.
नेहरू युवा केंद्र गोंदियाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मित्रमंडळ सालेकसाच्या सहकार्याने आदिवासी सांस्कृतिक भवन सालेकसा येथे पडोस युवा संसद कार्यक्रमात युवकांना विविध विषयावर मार्गदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रम सोमवारी १४ मार्चला घेण्यात आले. याप्रसंगी त्या मार्गदर्शन करीत होत्या.
उद्घाटन सविता संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रा. भगवान साखरे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. दिप्ती चौरागडे, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा सहसमन्वय अखिलेश मिश्रा, पोलीस उपनिरीक्षक अतुल कदम, प्रा. भूषण फुंडे, प्रा. प्रतिमा फुंडे, प्रा. अश्विन खांडेकर, विजय मानकर, गणेश भदाडे, रंजू टेकाम व इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी सविता पुराम यांनी, आजघडीला मोबाईल, इंटरनेट, कॉम्प्युटर इत्यादी आधुनिक साधने आपल्यासाठी भरपूर उपयोगाचे ठरत आहेत. परंतु या साधनांचा वापर करताना त्यातच आपला किमती वेळ वाया जाऊ देऊ नका. आपला वेळ आणि आपली ताकद आपल्या भविष्यासाठी, समाजासाठी आणि देशासाठी कशी उपयोगी पडेल यासाठी सतत प्रयत्नशील रहावे. त्याचप्रमाणे आपण ज्या संस्कारात व संस्कृतित जन्मलो व मोठे झालो त्या संस्कारांचा व संस्कृतीचासुद्धा विसर न करता आपले आई-वडील व आपल्या ज्येष्ठ हितचिंतकांना कधीच उपेक्षित करू नये. ज्येष्ठांचा आशीर्वाद व सहकार्य आपली खूप मोठी ताकद असते, हे लक्षात असू द्या, असे त्या म्हणाल्या.
यानंतर प्रा. भगवान साखरे यांनी व्यसनाचे दुष्परिणाम सांगत या वाईट सवयींपासून सतत दूर राहिल्यास आपल्या जीवनात सुख-समृद्धी कायम राहील, असे सांगितले. प्रा. दिप्ती चौरागडे यांनी ‘माहितीचा अधिकार अधिनियम २०१५’ या कायद्याची माहिती देत या कायद्याची पार्श्वभूमी, गरज आणि उपयोग यावर मार्गदर्शन केले. पोलीस उपनिरीक्षक कदम यांनी आपल्या मार्गदर्शनात, युवकांनी स्वत:ची शक्ती ओळखून आत्मबल खचित न करता, शक्तीचा उपयोग करण्यासाठी सदैव आत्मविश्वासी बनून राहण्याचे आवाहन केले. नेहरू युवा केंद्राचे सह समन्वयक अखिलेश मिश्रा यांनी भारताच्या प्राचीन काळापासून असलेल्या वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या उलगडा केला. रामायण, महाभारतात घडणारे चमत्कार त्याकाळी वैज्ञानिक प्रगतीची प्रचिती करवून देणारी आहे. अनेक वैज्ञानिकसुद्धा मान्य करीत आहेत. भारताने आपल्या धार्मिक संस्कृतीच्या माध्यमातून जगभरात कलाकौशल्याचा व बौद्धिक क्षमतेचा प्रसार केला, असे म्हणाले. याप्रसंगी इतर मान्यवरांनीसुद्धा मार्गदर्शन केले.
संचालन पवन पाथोडे यांनी केले. आभार देवेंद्र फरदे यांनी मानले. प्रास्ताविक संगिता हत्तीमारे यांनी मांडले व युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार द्वारे आयोजित ‘पडोस युवा संसद’ कार्यक्रमाची संकल्पना स्पष्ट केली.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करीत मान्यवरांनी युवकांचे प्रेरणास्त्रोत स्वामी विवेकानंद आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. तदनंतर मार्गदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांची सांगड घालत ज्ञान आणि मनोरंजनाची संगत साधण्यात आली.
कार्यक्रमासाठी मनीषा कुतीर, विजय उईके, पृथ्वीराज हत्तीमारे, सरिता बिसेन, दिव्या भगत, पूजा डोंगरे, आरती बघेले, भारती बहेकार, हेमराज मेंढे, नीलेश दोनोडे आदींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The youth should utilize the tools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.