हिस्से वाटपावरून युवकाची हत्या
By Admin | Updated: August 24, 2014 23:35 IST2014-08-24T23:35:20+5:302014-08-24T23:35:20+5:30
मिळालेल्या मोबाईलच्या वाटणीला घेऊन झालेल्या भांडणात तरूणाचा खून करण्यात आला. जवळच्या मित्रांनीच हे कृत्य केल्याचे चौकशीत दिसून येत असून पोलिसांनी याप्रकरणी पाच संशयीतांना

हिस्से वाटपावरून युवकाची हत्या
आमगाव : मिळालेल्या मोबाईलच्या वाटणीला घेऊन झालेल्या भांडणात तरूणाचा खून करण्यात आला. जवळच्या मित्रांनीच हे कृत्य केल्याचे चौकशीत दिसून येत असून पोलिसांनी याप्रकरणी पाच संशयीतांना ताब्यात घेतले आहे. २० आॅगस्ट रोजी ही घटना घडली. विशेष म्हणजे प्रकरणाचे बिंग फुटू नये म्हणून आरोपींनी मृतदेह सालेकसा तालुक्यातील ग्राम अंजोरा येथे शेतात टाकले होते असे पोलिसांकडून कळले. प्रकरणातील मृत तरूणाचे नाव हिवराज चंदू भसारे (३५, रा.लबाडधारणी) असे आहे.
हिवराज याला वाटेत एक मोबाईल सापडला होता. सापडलेल्या मोबाईलची मित्रांसह विक्री करून आलेल्या पैशांत त्यांनी २० आॅगस्ट रोजी रामाटोला (शिकारीटोला) येथे मद्यपार्टी केली. या पार्टीत हिवराज याने मित्रांना पार्टीवर खर्च केल्यानंतर उरलेल्या पैशातून हिस्सा मागीतला. मात्र पैशांना घेऊन त्यांच्यात वाद झाला. यात मित्रांनी मिळून हिवराजचा गळा आवळून खून केला. तर हत्येचे बिंग फुटू नये यासाठी त्यांनी हिवराजचा मृतदेह त्याच रात्री १५ किलोमिटर अंतरावर असलेल्या अंजोरा जवळील भालीटोला भजेपार रस्त्यावरील मनोज बहेकार यांच्या शेतातील तणसात झाकून होता असे पोलिसांनी सांगीतले.
शेतमालकाचे बटईदार शिवशंकर किसन गायधने यांना २३ आॅगस्टला सायंकाळी शेतशिवारात मृतदेह आढळून आल्यावर त्यांनी पोलिसांना सुचना दिली. पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२, २०१ अंतर्गत गुन्हा नोंद करून तपास सुरू केला व प्रकरणात पाच संशयीतांना ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल राजे करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)
आत्महत्येचा प्रयत्न
गोंदिया : शहरातील गोविंदपूर येथील इम्रान सुभान शेख (२२) या तरूणाने अंगावर रॉकेल टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी सकाळी घडली. तो १५ टक्के भाजला असून त्याला केटीएस रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.