गोंदिया : जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान विधान परिषद सदस्य परिणय फुके यांच्या ताफ्यातील पोलिस वाहनाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीचालक गंभीर जखमी होऊन त्याचा उपचारापूर्वीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. १९) सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास ग्राम हिरडामाली येथील बसस्थानकाजवळ घडली. अरविंद पन्नालाल चव्हाण (३३, रा. गणेशनगर, गोरेगाव) असे मृताचे नाव आहे.
अरविंद चव्हाण येथील सार्वजनिक बांधकाम विभागात कंत्राटी वाहनचालक पदावर कार्यरत होता. तो गोंदियाकडून गोरेगावकडे जात असताना कोहमाराकडून गोंदियाकडे येणाऱ्या आ. परिणय फुके यांच्या ताफ्यातील वाहन क्रमांक एमएच ३५-एआर २१६९ ने त्याच्या मोटारसायकल क्रमांक एमएच ३५-एपी ७५२७ ला धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, अरविंदच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्या ताफ्यातील एका वाहनाने त्याला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले. मात्र, उपचार घेण्यापूर्वीच अरविंदचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात गोरेगाव पोलिसांनी प्राथमिकदृष्ट्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपासानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे ठाणेदार आर. जे. पिपरेवार यांनी सांगितले.
फुके यावे, या मागणीसाठी उत्तरीय तपासणी रोखलीआमदार फुके यांच्या ताफ्यातील वाहनाने अपघात झाला. यामुळे ते आल्याशिवाय उत्तरीय तपासणी करू नका, असा पवित्रा मृताच्या नातेवाइकांनी घेतला. तब्बल ६ तास उलटूनही आ. फुके न आल्यामुळे मृताच्या घरातील महिला मंडळींनी चक्क शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा गेट रोखून धरला. वृत्त लिहीपर्यंत फुके यांनी भेट दिली नव्हती.
पदाधिकाऱ्यांनी घेतली सांत्वना भेट
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. दिलीप बन्सोड, काँग्रेसचे नेते अशोक ऊर्फ गप्पू गुप्ता, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक गंगाधर परशुरामकर, भाजपचे माजी समाजकल्याण सभापती विश्वजीत डोंगरे, माजी पं. स. सभापती मनोज बोपचे यांनी भेट घेऊन मृताच्या कुटुंबीयांची सांत्वना केली.
त्या वाहनाचा विमा नाहीहिरडामाली येथे झालेल्या अपघातातील वाहन क्रमांक एमएच ३५-एआर २१६९ चा विमा नसल्याची बाब पुढे आली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाला आले छावणीचे रूप
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवगृहात मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले असता त्या ठिकाणी गोंधळ होऊ नये, यासाठी शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला छावणीचे रूप आले होते.