गोंदिया : रक्तदान हे पवित्र दान आहे. कोणत्याही आमिषाने रक्तदान करू नये, तशी अपेक्षा बाळगू नये, अशी कायद्यात अपेक्षा आहे. अनेकदा रक्तदान शिबिर आयोजक रक्तदात्यांना आकर्षित करण्यासाठी विविध भेटवस्तूंचे आमिष दाखवणारे पोस्टर लावतात. काही महिन्यांपूर्वीच राज्य रक्त संक्रमण परिषदेने सविस्तर पत्र काढून रक्तदान केंद्रांना कोणतेही आमिष रक्तदात्यांना देऊ नये, तसेच शिबिर आयोजकांनासुद्धा तशा सूचना दिल्या आहेत. नियमांचे पालन न झाल्यास कारवाईचे आदेशही दिले आहेत.
'एसबीटीसी'चे निर्देश रक्तदान शिबिर आयोजकांनी रक्त्तदात्यांना कोणत्याही भेटवस्तू देऊ नये. रक्तदान हे स्वैच्छिक आहे. रक्तपेढींनी रक्तदान शिबिर आयोजित करणाऱ्या संस्थेकडून आम्ही अशा कोणत्याही भेटवस्तू देणार नाहीत, असे हमीपत्र घ्यावे. शिबिरात रक्तदानाबाबत जनजागृती करणारे साहित्य, टोपी, टी- शर्ट तसेच जेवणाचे कुपण देण्यास हरकत नाही.
शिबिरांचे रेकॉर्ड ठेवावे लागणार रक्तपेढींनी कोणत्या ठिकाणी शिबिर आयोजित केले आहे. त्यामध्ये किती रक्तदान झाले, याची सविस्तर माहिती ठेवावी लागणार आहे. तसेच रक्त संक्रमण परिषदेकडून कधीही हे सर्व रेकॉर्डस् आता तपासण्यात येणार आहे.
प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार नवीन रक्तपेढी सुरू करताना तसेच आहेत त्या रक्तपेढ्यांचे नूतनीकरणाच्या वेळी त्यांनी ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र द्यावे लागणार आहे. त्यामध्ये त्यांना राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेच्या नियमानुसार रक्तदान हे स्वैच्छिक, विनामोबदला आणि रक्तदात्याच्या स्वइच्छेनुसार आहे. कुठलाही मोबदला रोख स्वरूपात किंवा वस्तूच्या स्वरूपात देता येत नाही. राज्य रक्त संक्रमण परिषदेने दिलेल्या नियमांचे पालन करू, असे लिहून द्यावे लागणार आहे.
...तर रक्त घेणाराही कचाट्यात
- कुठल्याही रक्तपेढीने नियमांचा भंग केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच नूतनीकरणावेळी त्याचा परवानासुद्धा रद्द होऊ शकतो.
- दिवाळी, निवडणुकीमुळे शिबिरे घटली होती. शिबिरांची संख्या झपाट्याने कमी झाली होती. त्यामुळे काही दिवस रक्त मिळत नव्हते.
रक्तपेढ्यांत रक्ताचा तुटवडा सध्याच्या घडीला सात दिवस रक्त पुरेल एवढा साठा बँकांमध्ये आहे. आता रक्तदान शिबिरे पुन्हा सुरु झाल्यामुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्त उपलब्ध होणार आहे
रक्तदान शिबिरांची गरज राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेकडून आलेली सर्व मार्गदर्शक तत्त्वे रक्तपेढ्यांना पाठविण्यात आली आहेत. त्यामुळे त्या नियमाप्रमाणेच रक्तदान शिबिरे आयोजित करणे अपेक्षित आहे. अपघातातील जखमींना रक्तपुरवठा करण्यासाठी तत्काळ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याची गरज आहे.