लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मद्यधुंद अवस्थेत पत्नीला शिवीगाळ करणाऱ्या वडिलांचा मुलाने काठीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.९) सायंकाळी ७:४० वाजता केशोरी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बोंडगाव-सुरबन येथे घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृताचे नाव विलास दयाराम मानकर (४७, रा. बोंडगाव-सुरबन) असे आहे.
मृत विलास मानकर मंगळवारी (दि.९) सायंकाळी ७:४० वाजेच्या सुमारास घरी आला. नेहमीप्रमाणे त्याने दारूचे सेवन केले होते व घरी आल्यानंतर त्याने पत्नी नाजुका मानकर यांना कारण नसताना शिवीगाळ सुरू केली. घरातील वातावरण नेहमीच त्याच्या मद्यपानामुळे त्रस्त असायचे. आईवर होत असलेल्या या अपमानास मुलगा संतोष विलास मानकर (२२) याने विरोध केला. पित्याचे वर्तन वारंवार आईला छळणारे व अपमानास्पद असल्यामुळे संतापलेल्या संतोषने बाजूलाच पडलेली काठी उचलून वडिलांच्या डोक्यावर जोरदार वार केला. पहिला वार लागताच विलास मानकर डगमगले व खाली कोसळले. त्यानंतर पुन्हा काठीने प्रहार झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर गावातील पोलिस पाटील मनोज मेश्राम यांनी तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेऊन माहिती दिली. त्यावरून केशोरी पोलिस ठाण्यात आरोपी मुलगा संतोष विलास मानकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक मंगेश काळी करीत आहे.