‘हो, आम्हीच मारले त्याला, अन् जाळलेही’
By Admin | Updated: March 12, 2015 01:15 IST2015-03-12T01:15:43+5:302015-03-12T01:15:43+5:30
नागझिरा अभयारण्याची सुरूवात ज्या गावातून होते त्या मंगेझरीत धुळवडीच्या दिवशी अनिल सखाराम हळदे (४५) या इसमाची गावातील पाच लोकांनी लाथाबुक्क्यांनी तुडवत हत्या केली.

‘हो, आम्हीच मारले त्याला, अन् जाळलेही’
मनोज ताजने गोंदिया
नागझिरा अभयारण्याची सुरूवात ज्या गावातून होते त्या मंगेझरीत धुळवडीच्या दिवशी अनिल सखाराम हळदे (४५) या इसमाची गावातील पाच लोकांनी लाथाबुक्क्यांनी तुडवत हत्या केली. यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गावाजवळील नाल्यात फरफटत नेऊन जाळून राख करण्यात आला. गावात कोणाशीही वैर नसताना केवळ तो इसम गावात जादूटोणा करतो या गैरसमजातून त्याची झालेली ही हत्या गावकऱ्यांमध्ये अंधश्रद्धा किती ठासून भरली आहे याचा प्रत्यय देते. या घटनेचा मागोवा घेण्यासाठी घटनास्थळी जाऊन तयार केलेला हा ‘आॅन द स्पॉट रिपोर्ट’.
‘हो, आम्हीच मारले त्याला. गावात जादूटोणा करीत होता तो. त्यामुळे तो आमच्या गावात नकोच होता आम्हाला. आम्ही सर्वांनी मिळून त्याला मारले आणि मग जाळून टाकले...’ असा कबुलीजबाब शुक्रवारी जादूटोण्याच्या संशयातून बेदम मारहाण करून हत्या झालेल्या मंगेझरी या गावातील पाच आरोपींनी पोलिसांकडे दिला. पश्चातापाची एकही लकीर चेहऱ्यावर येऊ न देता दिलेला त्यांचा हा कबुलीजबाब आणि प्रत्यक्ष गावात पसरलेली निरव शांतता पाहून मंगेझरीतील गावकऱ्यांना जादूटोण्याच्या भितीने ग्रासले होते याची कल्पना देते.
या हत्याकांडाच्या पाच दिवसानंतरही मंगेझरीत भययुक्त वातावरण कायम आहे. गावातील चौकात, कँटीनवर बसून लोक हळूवारपणे या प्रकरणावर चर्चा करीत असले तरी गावाबाहेरील कोणत्याही व्यक्तीशी बोलताना अतिशय सावध पवित्रा घेत आहेत. या प्रकरणाबद्दल आपल्याला काहीही माहीत नाही. ही घटना कुठे झाली, कशी झाली, त्याची पार्श्वभूमी काय यावर गावकरी चकार शब्द तोंडातून काढायला तयार नाही. काही जण तर आपण गावातच नव्हतो, असे सांगून या प्रकरणी आपण किती अनभिज्ञ आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न करतात. पण सर्वांच्या चेहऱ्यावरील भाव आणि कोरडेपणा पाहून या घटनेबद्दल गावात कोणालाही हळहळ वाटत नसल्याचे स्पष्ट दिसते. मृत अनिल हळदे जादूटोणा करीत होता असाच प्रत्येकाचा गैरसमज होता असे यावरून दिसते. सध्या गावात बाहेरील अनोळखी व्यक्ती आली की त्याच्याकडे संशयाने पाहिले जाते.
एकीकडे रंगाची तर दुसरीकडे रक्ताची होळी
अनिल हळदे ५ फेब्रुवारीला गावातील काही लोकांसोबत भुसावळ येथे गेले होते. बरोबर एक महिन्यानंतर म्हणजे ५ मार्चला ते परत आले. मात्र तिरोडा रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर इतर सोबती गावाकडे तर अनिल दारूच्या दुकानात गेला. त्यामुळे त्याची गावाकडे येण्याची गाडी हुकली. दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाच्या दिवशी तो गावात आला. पण जणुकाही त्याच्या येण्याच्या प्रतीक्षेतच असलेल्या मारेकऱ्यांनी त्याला लगेच गाठून त्याचा गेम केला. एकीकडे सर्वजण रंगाची होळी खेळत होते तर अनिलसोबत मारेकरी रक्ताची होळी खेळत होते. लाथाबुक्क्यांनी बेदम मारून त्याला रक्तबंबाळ केल्यानंतर त्याला तसेच फरफटत अर्धा किलोमीटर नेऊन गावाबाहेरील नाल्यात नेऊन सायंकाळच्या सुमारास जंगलातील पडलेल्या झाडाखाली आणखी लाकडे टाकून जाळून टाकले.