यावर्षीही पावसाची टक्केवारी कमीच

By Admin | Updated: May 23, 2015 01:41 IST2015-05-23T01:41:57+5:302015-05-23T01:41:57+5:30

गेल्यावर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ७२ टक्के पाऊस बरसला. यावर्षी राज्यात सरासरी ९३ टक्के पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

This year too, the percentage of rainfall is less | यावर्षीही पावसाची टक्केवारी कमीच

यावर्षीही पावसाची टक्केवारी कमीच

योग्य नियोजन करा : कृषी विभागाने दिला शेतकऱ्यांना सल्ला
गोंदिया : गेल्यावर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ७२ टक्के पाऊस बरसला. यावर्षी राज्यात सरासरी ९३ टक्के पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे जिल्ह्यात यावर्षीही कमी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधपणे पिकांची लागवड करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामासाठी कृषी विभागाने १.९५ लाख हेक्टरमध्ये विविध पिकांची लागवड करण्याचे नियोजन केले आहे. भात पिकाची लागवड केली जात असल्याने विविध वाणाचे ४४ हजार क्विंटल भात बियाणे तालुकानिहाय विक्री केंद्रावर उपलब्ध करवून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महाबीजकडून तालुकानिहाय बियाणे पुरवठा करण्यात येणार आहे.
गोंदिया तालुक्यात - चार हजार ५०० क्विंटल, तिरोडा- चार हजार क्विंटल, आमगाव- चार हजार क्विंटल, गोरेगांव- तीन हजार ५०० क्विंटल, सडक-अर्जुनी- चार हजार ५०० क्विंटल, अर्जुनी-मोरगाव- चार हजार ५०० क्विंटल, सालेकसा- दोन हजार क्विंटल, देवरी- तीन हजार क्विंटल असे एकूण ३० हजार क्विंटल भात बियाणे पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे खाजगी कंपन्यांकडून १४ हजार क्विंटल पुरवठाचे नियोजन असून एकूण ४४ हजार क्विंटल भात बियाणे उपलब्ध होणार आहे.
खरीप हंगामासाठी शासनाकडून ५८ हजार १०० मेट्रीक टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर करण्यात आले असून तालुकानिहाय कृषी केंद्रावर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके योग्य दर्जाचे उपलब्ध व्हावे म्हणून जास्तीत जास्त नमूने काढून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्याचे निर्देश सबंधितांना देण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना कृषी निविष्ठाबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी अधिकारी पंचायत समितीकडे संपर्क साधून तक्रार नोंदविण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. खरेदी केलेल्या कृषी निविष्ठाची पक्की पावती प्राप्त करून घ्यावी, बॅग/कंटेनरवर छापील किमतीपेक्षा जास्त रक्कम अदा करू नये. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरील यांनी केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
श्री पद्धत, रूपांतरित व पेरिव पद्धतीचा वापर करा
हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षीची पावसाचे प्रमाण कमी असून ते अनियमित असण्याची शक्यता आहे. पावसात खंड पडल्यास भात रोपवाटिकेतील रोपे नष्ट होण्याचे प्रमाण वाढते. अशावेळी शेतकऱ्यांनी रोपवाटिकेच्या रोपांची लागवड एकाचवेळी न करता ती काही अंतर देऊन (टप्प्याटप्प्याने) करावी. बियाण्यांची कमतरता भासल्यास स्वत:कडीला बियाणे श्री पद्धतीद्वारे रोपे तयार करून आपात्कालीन पेरणीसाठी शिल्लक ठेवावे. रोवणीस उशिर झाल्यास श्री पद्धतीने जास्त लागवड करावी. रूपांतरित श्री पद्धतीने धान पिकांची लागवड करावी. श्री पद्धतीने लागवड करताना हेक्टरी ५ किलो बियाण्यांची आवश्यकता असून १२ ते १५ दिवसांची रोपे लागवडीकरिता वापरता येतील, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी कळविले.

Web Title: This year too, the percentage of rainfall is less