आदिवासी महिलांचे संसार फुलू लागले

By Admin | Updated: July 22, 2015 02:09 IST2015-07-22T02:09:27+5:302015-07-22T02:09:27+5:30

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील आदिवासीबहुल वारव्ही, परसटोला, अरततोंडी, धमदीटोला, खडकी, उमरपायली, जांभळी या गावात प्रामुख्याने धानपीक घेतले जात होते.

The world of tribal women started to flourish | आदिवासी महिलांचे संसार फुलू लागले

आदिवासी महिलांचे संसार फुलू लागले

आर्थिक टंचाईवर मार्ग : कोसा शेतीमधून हेक्टरी पाच ते सात हजार कोस निर्मिती
केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील आदिवासीबहुल वारव्ही, परसटोला, अरततोंडी, धमदीटोला, खडकी, उमरपायली, जांभळी या गावात प्रामुख्याने धानपीक घेतले जात होते. या परिसरात सिंचनाची व्यवस्था पुरेशी नसल्याने दरवर्षी या आदिवासी कुटुंबांना दुष्काळाशी सामना करावा लागत असे. पर्यायाने त्यांच्यासमोर अनेक आर्थिक अडचणी निर्माण होत होत्या. मात्र आता रेशीम (कोसा) उत्पादनातून त्यांचे संसार फुलू लागल्याचे दिसून येत आहे.
परिसरातील आदिवासी कुटुंबे दुष्काळामुळे नेहमीच आर्थिक संकटात सापडत होते. एवढ्यातच गेल्या वर्षापासून बायफ डेव्हलपमेंट रिसर्च आणि बायफ मित्र संस्थेच्या संयुक्त विद्यमाने केंद्र शासनाच्या मदतीने महिला किसान सशक्तीकरण परियोजनेंतर्गत या भागातील आदिवासीबहुल खेड्यांची निवड करण्यात आली. आदिवासी भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांच्या उत्थानासाठी महिलांकरिता टसर रेशीम शेती प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले.
कोसा शेतीमधून हेक्टरी पाच ते सात हजार कोस निर्मिती केली जात असून यासाठी शासनाकडून पीक विमा योजनासुध्दा कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रकल्पाला अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या असून प्रकल्प योग्यरित्या कार्यान्वित असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. यामध्ये बऱ्यापैकी उत्पन्न मिळू लागल्याने आदिवासी महिला रेशीम उत्पादन शेतीकडे वळल्या व आता कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांचा हातभार लागत आहे. आदिवासी महिलांना कोसा प्रकल्प म्हणजे एक प्रकारची नवसंजीवनी मिळून त्यांचे संसार फुलू लागल्याने निदर्शनास येऊ लागले आहे.
या उद्योगामधून आदिवासी महिलांना बळ मिळाले असून महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यास सदर संस्थेला फार मोठे यश आले आहे. या भागातील गरीब व आदिवासी शेतकरी कुटुंबांनी धान शेतीवर अधिक भर देण्यापेक्षा कोसा (रेशीम) शेतीकडे अधिक भर दिल्यास आदिवासींचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या करण्यावर नियंत्रण निश्चितच येवू शकते. त्यासाठी कोसा उत्पादन शेतीकडे शेतकऱ्यांनी वळण्याची गरज आहे. (वार्ताहर)
वर्षातून तीनदा घेतले जाते उत्पादन
परियोजना क्रियान्वयन संस्था (बायफ) आणि परियोजना कार्यान्वयन मित्र संस्थेचे नोडल अधिकारी निलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षापासून या आदिवासीबहुल भागात गरीब व आदिवासी कुटुंबातील महिलांसाठी टसर कोसा उत्पादन शेती प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले.
आदिवासी कुटुंबांना रेशीम उद्योगापासून रोजगार मिळावा, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी या उद्देशाने सदर रेशीम उद्योग प्रकल्पांतर्गत मोफत कोसा अंडी पुरविण्यात येतात. येथील कोसा उत्पादकांना आपल्या जवळची कोणत्याही प्रकारची लागत न लावता वर्षातून तीनदा कोसा (टसर) उत्पादन घेतले जाते.
या कोसा प्रकल्पात टसर अळीची अंडी उबवणे, अंडीतून जन्माला येणाऱ्या अळींची राख करून आंजन किंवा ऐन या वृक्षावर जोपासना करण्यात येऊन कोसा (रेशीम) तयार करण्याची कामे केली जातात.

Web Title: The world of tribal women started to flourish