जागतिक तंबाखू सेवनविरोधी दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:36 IST2018-06-04T00:36:00+5:302018-06-04T00:36:00+5:30
सामाजिक न्याय विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग व पब्लिक सोशल हेल्थ डिपार्टमेंट (जीएमसी) यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक बाई गंगाबाई महिला व बाल रुग्णालयात जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिवस साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त जनजागरण अभियान राबविण्यात आले होते.

जागतिक तंबाखू सेवनविरोधी दिन साजरा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सामाजिक न्याय विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग व पब्लिक सोशल हेल्थ डिपार्टमेंट (जीएमसी) यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक बाई गंगाबाई महिला व बाल रुग्णालयात जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिवस साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त जनजागरण अभियान राबविण्यात आले होते.
उद्घाटन बाई गंगाबाई रूग्णालयाचे वरिष्ठ प्रसूतीतज्ज्ञ डॉ. सायास केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर, जनसंपर्क अधिकारी अनिल गोंडाणे, दंतचिकित्सक डॉ. नाकाडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी उपस्थित कर्मचारी, सर्व स्टाफ, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना तंबाखू मुक्तीची शपथ दिली. तसेच मेडीकल कॉलेज परिसर तंबाखूमुक्त ठेवण्याची विनंती केली.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रसूती तज्ज्ञ डॉ. केंदे्र यांनी, गोंदिया सारख्या आदिवासीबहुल व दुर्गम भागात महिलांना गुडाखूचे व्यसन आहे. गर्भवती महिलांनी गुडाखूचे सेवन केल्याने गर्भस्थ शिशुचे नुकसान होते. कमी वजनाचे व अपुऱ्या दिवसांचे किंवा मृत बाळ जन्माला येते. म्हणून व्यसन करु नये, असे सांगितले.
तर डॉ. हुबेकर यांनी, युवकांना तंबाखू, खर्रा, खैनी आदि सर्व व्यसनांपासून दूर रहावे. तंबाखू माणूस खातो व नंतर मात्र तंबाखू माणसाला खाते. तसेच आध्यात्मिक विचारांची जोपासना करावी व वाईट सवयींवर विजय मिळवावा, असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी रूग्णांच्या नातेवाईक व परिसरातील लोकांनी आपल्या जवळच्या तंबाखू व खर्राच्या पुड्यांची होळी करुन यापुढे कधीही तंबाखू न खाण्याचा संकल्प घेतला. कार्यक्रमासाठी सचिन, ब्राम्हणकर, राहुल बावनथडे, शाहजाद शेख, गुड्डू चौधरी, सलमान पठान, सेवकराम शेंडे, सुरेंद्र राऊत आदिंनी सहकार्य केले.
तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात
तंबाखू नियंत्रण कार्यक्रम
तिरोडा येथील उपजिल्हा रूग्णालयात जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात आला. या वेळी रूग्णांना तंबाखूचे दुष्परिणाम व व्यसनांचे दुष्परिणाम याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच रूग्णांची मुख तपासणी करण्यात आली. अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम होते. त्यांनी तंबाखू व्यसनाचे हृदयावर कसे दुष्परिणाम होतात याबद्दल माहिती सांगून, हृदयरोग होण्याची दाट शक्यता असते, असे सांगितले. तसेच दंत शल्य चिकित्सक डॉ. अनिल आटे यांनी, तंबाखूमुळे मुखकर्करोग व फायब्रोसिस होते, असे सांगितले. उपजिल्हा रूग्णालयाच्यावतीने तंबाखू विरोधी सप्ताह राबविण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले. शेवटी तंबाखू सोडण्याकरिता सर्वांना शपथ देण्यात आली. संचालन गणेश तायडे यांनी केले. आभार टेलिमेडीसिन सुविधा व्यवस्थापक कमलेश शुक्ला यांनी मानले. कार्यक्रमासाठी डॉ. आशिष बन्सोड, डॉ. श्रद्धांजली रहांगडाले, दिनेश बल्ले, लीलाधर कुसराम व अनमोल लोखंडे यांनी सहकार्य केले.