जागतिक परिचारिका दिन साजरा
By Admin | Updated: May 16, 2015 01:27 IST2015-05-16T01:27:28+5:302015-05-16T01:27:28+5:30
जागतिक महायुध्दात जखमींवर रात्रीच्या अंधारात हातात दिवा घेऊन उपचार करणाऱ्या जगातील पहिल्या परिचारिका फ्लोरेन्स नाईटिंगेल यांची जयंती

जागतिक परिचारिका दिन साजरा
गोंदिया : जागतिक महायुध्दात जखमींवर रात्रीच्या अंधारात हातात दिवा घेऊन उपचार करणाऱ्या जगातील पहिल्या परिचारिका फ्लोरेन्स नाईटिंगेल यांची जयंती जागतिक परिचारिका दिन म्हणून जिल्ह्यातील अनेक रूग्णालयात साजरी करण्यात आली. यावेळी सर्व परिचारिकांनी त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून रूग्णसेवेचा व्रत घेण्याची शपथ घेतली. ग्रामीण रुग्णालय देवरी : ग्रामीण रुग्णालय देवरी येथे मंगळवार (दि.१२) फ्लोरेन्स नाईटिंगल जन्मदिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी पार्वता चांदेवार होते. अतिथी म्हणून राजू चांदेवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. धुमनखेडे, प्राथमिक आरोग्य केंद्र मूल्लाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. लांडके उपस्थित होते. संचालन अधिपरिचारिका सुलभा खाडे यांनी केले. फ्लोरेन्स नाईटिंगल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण, दीप प्रज्ज्वलित करून व केक कापून जन्मदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर प्रार्थना गीत पुष्पा धुर्वे, सिस्टर अमृता यावले, सिस्टर खाडे यांनी सादर केले. सिस्टर रिना सयाम यांनी पाळणा गीत सादर केले. राजेश चांदेवार यांनी आपले विचार व्यक्त केले. सिस्टर अश्विनी बन्सोड व सिस्टर स्वाती चोपकर यांनी गीत सादर केले. या दिवसाचे महत्व व सिस्टर जीवन या विषयावर डॉ. गगन गुप्ता व डॉ. उल्हास मेश्राम यांनी विचार व्यक्त केले. शेवटी अध्यक्षा चांदेवार व डॉ. लांडगे यांनी उपस्थित सर्व सिस्टर यांना एक-एक गुलाब पुष्प देवून त्यांचा सत्कार केला. अल्पोहाराचा कार्यक्रम आटोपून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी खाडे, पुष्पा धुर्वे, स्वाती चोपकर, अश्विनी बन्सोड, त्रिवेणी चन्नेकर, निशा आचले, पुजा हुकरे, अमृता यावले यांनी सहकार्य केले. गंगाबाई महिला रूग्णालय गोंदिया : बाई गंगाबाई महिला व बाल रुग्णालयात जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते यांनी केले. अतिथी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिश कळमकर, गंगाबाईचे इंचार्ज डॉ. संजीव दोडके, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर, डॉ. प्रियंका उभाड, मेट्रन अरुणा मेश्राम, नर्सिग स्कूलच्या प्राचार्य सुखदेवे उपस्थित होते. सर्वप्रथम जगातील आद्यपरिचारिका फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व मेणबत्ती लावून आदरांजली अर्पित केली. त्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थ्यांना शपथ देण्यात आली. हॅप्पी बर्थ डे फ्लोरेन्स नार्इंटिगेल म्हणत केक कापण्यात आला. प्रास्ताविक डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी केले. आपल्या मार्गदर्शनात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते यांनी, परिचारिकांनी फ्लोरेन्स नाईटिंगेलचा आदर्श घ्यावा. मातामृत्यू व बालमृत्यू कमी करण्यासाठी स्वत:ला सेवेत वाहून घ्यावे. प्राचार्य सुखदेवे यांनी नर्सिग सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे. रुग्णालाच देव समजून सेवा करावी. यानंतर डॉ. रवी धकाते यांच्या हस्ते उत्कृष्ट सेवा देणाऱ्या सेवाव्रती परिचारिकांना यावर्षीचा फ्लोरेन्स नाईटिंगेल अवार्ड देण्यात आला. त्यात लसीकरण व सांख्यिकी विभाग सांभाळणाऱ्या पीएचएन इंगळे, प्रसूती विभागाच्या इंचार्ज दीपा रोकडे, एनआरसीच्या मित्रा, स्टाफ नर्सेस निलू चुटे, उषा जावळे, छाया डोईफोडे, दीप्तिशिखा साळवे आदींचा डॉ. रवी धकाते यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच नर्सिग स्कूलच्या प्राचार्य सुखदेवे यांचा फ्लोरेन्स नाईटिंगल विशेष अवार्डने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिष कळमकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन शुभांगी मैदकर यांनी केले. आभार गजानन खेडकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी अरूणा मेश्राम, शीला तमखाने, शुक्ला व नर्सिग स्कूलच्या सर्व स्टॉफने सहकार्य केले. स्रेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. (प्रतिनिधी)