कर्मचाऱ्यांचे निषेध आंदोलन
By Admin | Updated: December 18, 2015 02:22 IST2015-12-18T02:22:25+5:302015-12-18T02:22:25+5:30
जिल्हा परिषदेचे सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राज गहलोत यांनी आरोग्य विभागाचे कनिष्ठ सहायक आर.एम. भोयर यांना जाळून टाकण्याची धमकी दिली.

कर्मचाऱ्यांचे निषेध आंदोलन
अधिकाऱ्याकडून धमकी प्रकरण : जि.प. कर्मचारी महासंघाचे निदर्शने
गोंदिया : जिल्हा परिषदेचे सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राज गहलोत यांनी आरोग्य विभागाचे कनिष्ठ सहायक आर.एम. भोयर यांना जाळून टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी गुरूवारी (दि.१७) जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या नेतृत्त्वात जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार नारेबाजी केली. यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एक निवेदन दिले.
या संदर्भात आरोग्य विभागाचे कर्मचारी भोयर यांनी केलेल्या तक्रारीनुसार, १६ डिसेंबरला दुपारी १.३० वाजता मुल्ला येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकाऱ्याविरूद्ध तक्रार आली. यावर डॉ. गहलोत यांनी डॉ. लांडगे यांच्या बदल संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. चर्चेत भोयर यांनी म्हटले की, बदलीचे अधिकार नागपूर येथील उपसंचालकांना आहेत. यावर गहलोत चिढले व म्हणाले की, बदलीचे अधिकार कोणाला आहेत, याबाबत त्यांना लिखित आदेश दाखविण्यात यावे. त्यांना आदेश दाखविण्यात आले नाही तर ते त्यांना जाळून टाकतील.
भोयर यांचे म्हणणे आहे की, यापूर्वी ५ डिसेंबरला सायंकाळी ६.३० वाजता त्यांच्याशी आमोरासमोर भेट झाली. यादरम्यान विनाकारण त्यांना कुत्रा असे म्हणण्यात आले. १५ डिसेंबरला डॉ. गहलोतद्वारे बोलाविण्यात आल्यावर ते त्यांच्या कक्षात गेले. मात्र त्यांना कक्षात यायला नको होते, असे म्हणण्यात आले. याबाबत त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनाही माहिती दिली आहे. डॉ. गहलोत यांच्या दुर्व्यवहारामुळे त्यांची मानसिक स्थिती खराब झाली आहे.
सदर निषेध आंदोलनात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष पी.जी. शहारे, उपाध्यक्ष कार्तिक चव्हाण, आर.डी. वलथरे, अनूप शुक्ला, सुदीप देव, अर्चना अयाचित, दिवाकर खोब्रागडे, एम.आर. मिश्रा, एस.डी. तुरकर, किशोर मुले, अन्विता श्रीवास्तव, संध्या रेटर, कविता लांजेवार, ओ.जे. बिसेन, एस.आर. खत्री यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)