कार्यकर्त्यांनो देश विकासासाठी झटा

By Admin | Updated: December 4, 2015 02:03 IST2015-12-04T02:03:09+5:302015-12-04T02:03:09+5:30

या देशातून भ्रष्टाचार, बेरोजगारी व गरिबी संपवून शेवटच्या घटकाचा विकास व्हायला पाहिजे.

Workers, the country is in for development | कार्यकर्त्यांनो देश विकासासाठी झटा

कार्यकर्त्यांनो देश विकासासाठी झटा

पालकमंत्री बडोले : भाजप शहर व ग्रामीण मंडळाचे प्रशिक्षण

गोंदिया : या देशातून भ्रष्टाचार, बेरोजगारी व गरिबी संपवून शेवटच्या घटकाचा विकास व्हायला पाहिजे. तरच आपला देश हा विश्वगुरु होऊ शकतो. या करिताच जनतेने आपल्या हाती सत्ता दिली आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी तर राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लोककल्याणकारी निर्णय घेऊन विविध योजना आणल्या जात आहेत. या योजना व निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. कार्यकर्त्यांनी आपले जीवन देशसेवा व देश विकासासाठी वाहून घ्यावे हीच आपल्या पक्षाची विचारधारा आहे, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना केले.
गोरेगाव तालुक्यातील सुर्यादेव मांडोदेवी देवस्थानातील सभागृहात रविवारी (दि.२९) आयोजित पं. दिनदयाल उपाध्याय महाप्रशिक्षण अभियानाअंतर्गत भारतीय जनता पार्टी गोंदिया शहर व ग्रामीण मंडळातील सक्रिय कार्यकर्त्यांच्या एक दिवसीय प्रशिक्षण अभ्यासवर्गातील समारोपीय सत्रात ते बोलत होते.
यावेळी भातीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, प्रदेश सदस्य अशोक इंगळे, नेतराम कटरे, मधु अग्रवाल, जिल्हा परिषद सभापती छाया दसरे, जिल्हा महामंत्री संतोष चव्हाण, वीरेंद्र अंजनकर, दीपक कदम, मंडळ अध्यक्ष नंदकुमार बिसेन, सुभाष आकरे प्रामुख्याने उपस्थित होते.
या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन खासदार नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, छाया दसरे, प्रमुख वक्ता प्रकाश मालगावे, उमेश मेंढे, राजेश बांते उपस्थित होते. खासदार पटोले यांनी, देशाच्या विकासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. सामान्य माणसाच्या जीवनात सुख व समृद्धी करिता अनेक योजना सुरु करण्यात आलेल्या आहेत. जनधन, अटल पेंशन, विमा, सुकन्या समृद्धी व मुद्रा योजना अशा अनेक योजना आहेत. याचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवा. भाजपाचा कार्यकर्ता हा संवेदनशील आहे. पार्टीला शक्तीशाली करण्याकरिता कार्यकर्त्यानी पूर्ण रुपाने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
वक्ता मेंढे यांनी, विचार, परिवार आणि संकल्पना या विषयावर माहिती दिली. द्वितीय सत्रात जिल्हा महामंत्री संतोष चव्हाण यांच्या अध्यक्षतेत ज्येष्ठे नेते व वक्ता मालगावे यांनी संघटन कार्यपद्धती या विषयावर सखोल माहिती दिली. तृतीय सत्रात प्रदेश सदस्य इंगळे यांच्या अध्यक्षतेत नागपूर विभागीय कार्यालय प्रमुख संजय फांजे यांनी मिडीया व सोशल मिडीया व्यवस्थापन या विषयावर कार्यकर्त्यांना माहिती दिली. चतुर्थ सत्रात बांते यांनी शासकीय योजना व संघटन समन्वय या विषयावर माहिती दिली.
पाचव्या सत्रात वक्ता मधुसूदन अग्रवाल यांनी सांस्कृतिक इतिहास व विकास या विषयावर माहिती दिली. प्रास्ताविक सुभाष आकरे यांनी मांडले. संचालन कदम यांनी केले. प्रशिक्षण वर्गात गोंदिया शहर व ग्रामीण मंडळातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Workers, the country is in for development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.