सर्वांच्या समन्वयातून चांगले काम करणार

By Admin | Updated: September 20, 2015 02:15 IST2015-09-20T02:15:19+5:302015-09-20T02:15:19+5:30

जिल्हा परिषदेत सर्वच विभागात अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत विविध पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामे तत्परतेने करताना थोडी अडचण निश्चित होत आहे.

Work well with all the coordination | सर्वांच्या समन्वयातून चांगले काम करणार

सर्वांच्या समन्वयातून चांगले काम करणार

मनोज ताजने गोंदिया
जिल्हा परिषदेत सर्वच विभागात अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत विविध पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामे तत्परतेने करताना थोडी अडचण निश्चित होत आहे. पण तरीही सर्वांच्या समन्वयातून जिल्हा परिषदेच्या योजनांची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. सर्वसामान्यांची कामे झाली पाहीजे यावर आपण भर देत असून त्यासाठी सर्वांना घेऊन चालणार आहे, अशी भावना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषाताई मेंढे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केली.
१५ सप्टेंबरला जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून दोन महिन्यांचा कार्यकाळ उषाताईंनी पूर्ण केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील एकूण वातावरणाचा त्यांनी केलेला अभ्यास आणि जि.प.च्या आपल्या कार्यकाळात त्या कशा पद्धतीने कारभारावर आपली छाप पाडणार याबद्दल त्यांना बोलते केले. त्यावर त्यांनी मनमोकळेपणाने आपल्या भावना वक्त केल्या.
उषाताई म्हणाल्या, यापूर्वी जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण समितीची सभापती म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे सत्तेत राहून काम करण्याचा त्यावेळचा अनुभव आता कामी येत आहे. दोन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची खुर्ची मिळाल्यानंतर येथील कारभारात फारशा काही त्रुट्या आढळल्या नाहीत. सर्व विभाग आपापल्या जागी काम करीत आहेत. काही योजनांसाठी निधीची गरज आहे. त्यासाठी प्रयत्नशील आहे. सोबतच कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. रिक्त असलेली सर्व विभागांची पदे भरण्यासाठी आम्ही प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळेच काही महिन्यात रिक्त पदांचा अडसर दूर होईल.
गेल्यावेळी जिल्हा परिषदेत पूर्णपणे भाजपची सत्ता होती. त्यावेळी अनेक कारणांनी जिल्हा परिषद गाजत होती. आता नवीन पदाधिकाऱ्यांच्या काळात कसे वातावरण राहणार, याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, जिल्हा परिषदेत आधीचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमध्ये कोणती भांडणे होत होती, किंवा कोण कोणावर वरचढ होत होते यात मी पडणार नाही. पण माझ्या कार्यकाळात असे काही होणार नाही. जिल्हा परिषद म्हणजे माझे दुसरे घर आहे. इथे सर्वांना घेऊन चालावे लागणार आहे. कामात राजकारण करणार नाही. आता तर सर्व कामे ई-टेंडर पद्धतीने आणि नियमानुसार होतील. कामात पारदर्शकता ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. अधिकारी पदाधिकाऱ्यांवर वरचढ होणार नाही. लोकांची कामे करण्यासाठी आम्ही बसलो आहोत. अनेक ग्रामीण लोक माझ्याकडे येऊन समस्या मांडतात. त्यांचे समाधान झाले पाहीजे असा प्रयत्न सुरू असतो.
भाजपसोबत जुळवून घेताना काही अडचणी येत नसल्याचे सांगत कामात पक्षीय मतभेद करणार नसल्याचे त्या म्हणाल्या. जिल्हा परिषदेच्या सर्व ५३ सदस्यांना न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. संपूर्ण जिल्हा हे माझे कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे एखाद्या सदस्याच्या क्षेत्रातील समस्या ही त्याची समस्या नसून ती माझी समस्या आहे असे समजून मी ती सोडविण्यासाठी प्राधान्य देणार आहे.
‘‘जिल्हा परिषदेत आधीचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमध्ये कोणती भांडणे होत होती, किंवा कोण कोणावर वरचढ होत होते, यात मी पडणार नाही. पण माझ्या कार्यकाळात असे काही होणार नाही. जिल्हा परिषद म्हणजे माझे दुसरे घर आहे. इथे सर्वांना घेऊन चालावे लागणार आहे. कामात राजकारण करणार नाही.’’
प्रत्येक सभेनंतर देणार पत्रकारांना माहिती
पत्रकारांचा मी खूप आदर करते. ते समाजाचा आरसा आहेत. त्यांना सर्वसाधारण सभेदरम्यान सभागृहात प्रवेश नसला तरी सभेनंतर प्रत्येक वेळी पत्रपरिषद घेऊन सभागृहात झालेल्या महत्वाच्या चर्चेची, निर्णयांची माहिती देणार असल्याचे उषाताईंनी सांगितले.
महिला सरपंचांना देणार बळ
आता ५० टक्के ग्रामपंचायतींवर महिला सरपंच विराजमान झाल्या आहेत. त्यांना कामे करताना अनेक अडचणी येतात. माझ्याशी बोलताना त्या आपल्या अडचणी सांगतात. त्यामुळे त्या अडचणींवर मात करून कशा पद्धतीने ‘स्ट्राँग’ व्हायचे याचे प्रशिक्षण त्यांना दिले जाईल. त्या स्ट्राँग झाल्या तर त्यांचा कारभार स्ट्राँग होईल. त्यामुळे त्यांना बळ देणे गरजेचे असल्याचे उषाताई म्हणाल्या.

Web Title: Work well with all the coordination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.