रोहयोच्या मजुरांना मिळणार रेशीम लागवडीचे काम
By Admin | Updated: October 21, 2014 22:53 IST2014-10-21T22:53:45+5:302014-10-21T22:53:45+5:30
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे कार्य करणाऱ्या मजुरांना आता रेशीम उत्पादनासाठी रोपट्यांच्या (तुती) लागवडीचे काम देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे रेशीम उत्पादनात वाढ होईल.

रोहयोच्या मजुरांना मिळणार रेशीम लागवडीचे काम
गोंदिया : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे कार्य करणाऱ्या मजुरांना आता रेशीम उत्पादनासाठी रोपट्यांच्या (तुती) लागवडीचे काम देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे रेशीम उत्पादनात वाढ होईल. या लागवडीच्या कार्याच्या माध्यमातून शासनाद्वारे गोंदिया जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या तालुक्यातील ग्रामीण भागातील भूमिहीन, अल्पभूधारक, मागास वर्गातील मजूर व शेतमजुरांना रोजगार मिळणार आहे.
रोहयोचे काम करणाऱ्या मजुरांचे हित व रेशीम उत्पादन करण्याच्या उद्देशाने शासनाने रोहयोच्या मजुरांना रेशीमसाठी रोपटे लागवडीचे कार्य देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांच्या ग्रामीण भागातील भूमिहीन व अल्पभूधारकांना रोजगार मिळेल व त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होवू शकेल.
या प्रकारे रेशीम उत्पादकांच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांची मजुरी शासनाच्या माध्यमातून मिळेल. त्यामुळे आता विनाखर्च कोस उत्पादन मिळेल. याशिवाय झाडे लावा झाडे जगवा या नितीच्या माध्यमातून पर्यावरण संतुलित ठेवण्यास मदतच होणार आहे.
रेशीमची शेती कृषी आधारित रोजगार निर्मित करणारा व्यवसाय आहे. रेशीम उत्पादकांना एक एकर जागेत लागवड करण्यासाठी २८० ते ३०० मजुरांची आवश्यकता असते. शेतकऱ्यास एक एकर तूती बागेतून ४० ते ५० हजार रूपयांचा लाभ मिळतो. परंतु शासनाच्या नवीन धोरणानुसार, ग्रामीण भागातील मागास वर्गातील मजूर, शेतमजूर, अल्प व अत्यल्प भूधारक लाभार्थ्यांना रोहयोच्या अंतर्गत गावातच रोजगार मिळेल.
पूर्वी रोहयोअंतर्गत नाले, नवीन रस्ते, लहान-मोठे तलाव, फळबाग योजना आदी काम होत असल्यामुळे कृषी कामासाठी मजुरांचा अभाव निर्माण होत होता. त्यामुळे शेतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. आता ही समस्या दूर होईल. आता कृषी कामासाठी मजुरांचा तुटवडा निर्माण होणार नाही व जिल्ह्यात रेशीम उत्पादनात वाढ होईल. (प्रतिनिधी)