व्यावसायिक पद्धतीने कामे करा
By Admin | Updated: November 8, 2015 01:46 IST2015-11-08T01:46:14+5:302015-11-08T01:46:14+5:30
टसर सिल्कचे उत्पादन हे अतिशय कष्टाचे काम आहे. मात्र यातून तुम्हाला भविष्यात चांगला रोजगार मिळेल.

व्यावसायिक पद्धतीने कामे करा
आंधळगाव येथे पाहणी : माविमच्या कुसुम बाळसराफ यांचे आवाहन
भंडारा : टसर सिल्कचे उत्पादन हे अतिशय कष्टाचे काम आहे. मात्र यातून तुम्हाला भविष्यात चांगला रोजगार मिळेल. त्यासाठी महिलांनी गटात एकजुट ठेवावी. यातून मिळणारा नफा सर्वांनी समान वाटुन घ्यावा आणि कमीत कमी वेळात जास्तीत जास्त उत्पादन करण्यासाठी व्यावसायिक पदधतीने काम करावे, असे प्रतिपादन माविमच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक कुसुम बाळसराफ यांनी केले.
आंधळगाव येथे सुरू करण्यात आलेल्या हॅण्डलुमचे उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी धीरजकुमार, डॉ.उल्हास बुराडे, माविमच्या जिल्हा समन्वयक ज्योती निंभोरकर, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ.नलिनी भोयर उपस्थित होत्या.
जिल्ह्यात माविम आणि रेशिम विभागाच्यावतीने सुरू असलेले काम पाहण्यासाठी कुसुम बाळसराफ आणि जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी बचत गटामार्फत सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. जामगाव, वरठी, आंधळगाव येथे भेट देऊन त्यांनी टसर कोष ते साडी उत्पादनाची संपुर्ण प्रक्रिया समजावून घेतली. गोसेखुर्द प्रकल्पात पुनर्वसित झालेले जामगाव येथे बचत गटामार्फत गावाला लागून असलेल्या जंगलात टसर कोषाचे उत्पादन घेण्याचे काम सुरू करण्यात आले. तिथे त्यांनी भेट दिली. एका हंगामात किती पीक घेऊ शकतात. निसर्गाचा पीक उत्पादनावर कसा परिणाम होतो.
महिलांना यामधून किती रोजगार मिळू शकतो, याची माहिती त्यांनी जाणून घेतली. महिलांशी संवाद साधुन येणाऱ्या अडचणी समजुन घेतल्या. या गावातील महिलांचे जीवन मजुरीवरच असल्याने हे पीक हातात येईपर्यत मजुरीचा प्रश्न सोडविण्यासाठी किंवा याला मग्रारोहयोशी जोडण्यासाठी प्रस्ताव तयार करून शासनाकडे विचारार्थ पाठवू, असे जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी सांगितले. वरठी येथे काथावर्क करणाऱ्या बचतगटाचे काम त्यांनी पाहिले. महिलांकडून उत्पादित ब्लॉक प्रिंट आणि काथावर्क केलेली चादर, साड्यांवर करण्यात येणारे सुंदर आणि उच्चतम दर्जाचे कलाकुसर पाहून त्यांनी महिलांचे कौतुक केले. (शहर प्रतिनिधी)