सालेकसा नगर पंचायतच्या नावाने चालणार कामकाज
By Admin | Updated: October 11, 2015 01:04 IST2015-10-11T01:04:13+5:302015-10-11T01:04:13+5:30
ओळख सालेकसाच्या नावाने, परंतु शासनाच्या रेकार्डवर आमगाव खुर्द अशा नावाने चालत असलेली ग्रामपंचायत आता सालेकसा नगर पंचायतमध्ये विसर्जित होणार आहे.

सालेकसा नगर पंचायतच्या नावाने चालणार कामकाज
आमगाव खुर्द : ग्रामपंचायत होणार इतिहासजमा
विजय मानकर सालेकसा
ओळख सालेकसाच्या नावाने, परंतु शासनाच्या रेकार्डवर आमगाव खुर्द अशा नावाने चालत असलेली ग्रामपंचायत आता सालेकसा नगर पंचायतमध्ये विसर्जित होणार आहे. १ आॅक्टोबरच्या निर्णयात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने महाराष्ट्र शासनाला याबद्दल दिशानिर्देश दिले आहे. २०१५ च्या जनहित खटला क्र.७२ वर वादी प्रतिवादी यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर उच्च न्यायालयाने शासनाला दिशानिर्देश देत सालेकसा नगर पंचायतीची निवडणूक थांबवून आधी त्यात आमगाव खुर्दला समाविष्ट करण्याची प्रक्रिया करण्याबाबत सांगितले.
१२ फेब्रुवारी २०१५ ला महाराष्ट्र शासनाने तालुका मुख्यालयातील ग्राम पंचायतींना नगर पंचायत म्हणून घोषित केले. त्यानुसार सालेकसा ग्रामपंचायतलाही नगर पंचायतचा दर्जा दिला आणि येथे प्रशासक नियुक्त करण्यात आले.
यादरम्यान शासनाने आमगाव खुर्द आणि सालेकसा येथील लोकांचा नगर पंचायतमध्ये समाविष्ठ करून घेण्याबद्दल अभिप्राय घेतला. परंतु आमगाव खुर्दच्या लोकांनी सतत तळ्यात-मळ्यातचा खेळ खेळणारी भूमिका घेतली होती. सुरुवातीला त्यांनी आमगाव खुर्दच्या नावाने नगर पंचायत करा अशी मागणी केली. परंतु शासनाच्या आदेशाप्रमाणे ज्या नावाने तालुका मुख्यालय चालत आहे त्याच नावाच्या ग्राम पंचायतला नगर पंचायत करा, असा आदेश असल्यामुळे त्यांची मागणी पूर्ण झाली नाही.
याचिकाकर्ता म्हणून ग्रा.पं. सदस्य ब्रजभूषणसिंह जागेश्वरसिंह बैस आणि वासुदेव महादेव चुटे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करीत महाराष्ट्र शासनाचे महसूल आणि नगरविकास सचिव, जिल्हाधिकारी गोंदिया आणि राज्य निवडणूक आयोग या तिघांना प्रतिवादी बनविले.
एकीकडे २८ सप्टेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने राज्यात नगर पंचायतीची निवडणूक घेण्याचे आदेश् काढले. सर्वत्र निवडणुकीची अधिसुचना काढण्यात आली आणि १ आॅक्टोबर २०१५ ला नागपूर उच्च न्यायालयात न्या. बी.आर. गवई आणि न्या.प्रसन्ना वराळे यांनी खटल्यावर सुनावणी करताना सालेकसा नगर पंचायतीची निवडणूक रद्द करून आमगाव खुर्द ग्रामपंचायतला सालेकसा नगर पंचायतीमध्ये विसर्जित करण्याची प्रक्रिया करावी व त्यानंतर पुढील प्रक्रिया करावी, असा दिशा निर्देश दिला.
तत्काळ प्रभावाने निवडणूक आयोगाने गोंदिया जिल्हाधिकारी आणि तहसीलदार सालेकसा यांना नगर पंचायत निवडणूक रद्द करण्याचे आदेश दिले. वादी प्रतिवादीकडून चर्चा उभी करताना सरकारी वकीलाने निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याचा प्रश्न उपस्थित केला. परंतु कोर्टाने म्हटले की ही प्रक्रिया आता प्रारंभिक स्थितीत असून ती रद्द करणे परवडेल. कारण आता निवडणुका घेऊन पुन्हा आमगाव खुर्दला समाविष्ट करणे व त्यानंतर पुन्हा नव्याने निवडणूक प्रक्रिया करणे परवडणार नाही.
आमगाव खुर्दला समाविष्ठ करण्याबाबत आमगाव खुर्द ग्राम पंचायत, सालेकसा ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद गोंदिया यांचे प्रस्ताव मागविण्यात येणार आहे.