जनसामान्यांची कामे हेच ध्येय
By Admin | Updated: April 19, 2017 00:16 IST2017-04-19T00:16:31+5:302017-04-19T00:16:31+5:30
या परिसरातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी, यासाठी आदिवासी भाग म्हणून इळदा येथील ....

जनसामान्यांची कामे हेच ध्येय
राजकुमार बडोले : आरोग्य केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन
केशोरी : या परिसरातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी, यासाठी आदिवासी भाग म्हणून इळदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला शासनाकडून मंजुरी मिळवून घेण्यात आली. या इमारतीच्या निर्मितीसाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही. येत्या दोन वर्षात सदर प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत पूर्णत्वास जाईल. जनसामान्यांची कामे करणे, हाच माझा संकल्प आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
आरोग्य विभाग जिल्हा परिषद गोंदियाच्या विद्यमाने अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या इळदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे यांच्या अध्यक्षतेखाली इमारत बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पं.स. सभापती अरविंद शिवणकर, सरपंच निशा धुर्वे, खंडविकास अधिकारी एन.आर. जमईवार, कृऊबासचे सभापती काशीम जमा कुरैशी, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, उमाकांत ढेंगे, प्रकाश पाटील गहाणे, ताणेश ताराम, पं.स. सदस्य रामलाल मुंगणकर, पं.स. सदस्य अर्चना राऊत, नंदकुमार गहाणे, डॉ. पिंकु मंडल, डॉ. कांबळे व सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.
ना. राजकुमार बडोले पुढे म्हणाले, या बरोबरच मालगुजारी तलाव, रस्ते, वनहक्क पट्टे, सिंचन व्यवस्था इत्यादी कामे प्रस्तावित असून येत्या काही दिवसात विकासाची कामे पूर्ण केली जातील, असे त्यांनी सांगितले. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी, शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले. त्यानंतर इमारत बांधकामाचे भूमिपूजन विधिवत पूजन करून कुदळ मारून करण्यात आले. यावेळी उपस्थितीत अतिथींचे विद्यार्थिनींकडून स्वागत गीताने स्वागत करण्यात आले.
प्रास्ताविकातून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एस.डी. निमगडे यांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र निर्मितीच्या कार्यासाठी ज्यांनी-ज्यांनी प्रयत्न केले, त्यांचे नाव न घेता धन्यवाद दिले. या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १४ गावांचा समावेश असून तीन उपकेंद्राचा समावेश राहणार आहे. त्यामधील आठ हजार ५०० नागरिकांना या प्राथमिक आरोग्य केंद्राचा लाभ होणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे औचित्य साधून आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना शाल व श्रीफळ देऊन सपत्नीक गौरविण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने केवळराम रामजी नाईक (परिचर), आनंदराव धोंडू किरसान (परिचर), बेबी आत्माराम शहारे, ताराचंद जगण कापगते (मलेरिया पर्यवेक्षक) यांचा समावेश आहे. सामाजिक कार्याबद्दल अनिल महादेव लाडे यांचादेखील सत्कार करण्यात आला.
संचालन कृष्णा खोटेले यांनी केले. आभार तालुका वैद्यकीय अधिकारी विजय राऊत यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र केशोरी व फिरते आरोग्य पथक इळदा येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.(वार्ताहर)