जंगलात गिट्टी खोदकाम सुरू

By Admin | Updated: April 8, 2017 00:53 IST2017-04-08T00:53:57+5:302017-04-08T00:53:57+5:30

देवरी तालुक्यातील ग्रामपंचायत बोरगाव-बाजार अंतर्गत पदमपूर येथील सरकारी जंगलात सर्रास गिट्टी खोदकाम सुरू आहे.

In the woods, the ballast carving started | जंगलात गिट्टी खोदकाम सुरू

जंगलात गिट्टी खोदकाम सुरू

वन कर्मचाऱ्यांचे संगनमत : पदमपूर येथील प्रकार
गोंदिया : देवरी तालुक्यातील ग्रामपंचायत बोरगाव-बाजार अंतर्गत पदमपूर येथील सरकारी जंगलात सर्रास गिट्टी खोदकाम सुरू आहे. यासाठी कंत्राटदाराकडून हजारोंच्या संख्येत झाडांची कत्तल करण्यात आली. वन कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हा सर्व प्रकार सुरू असून वन विभागाचे अधिकारीही याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी पदमपूरवासीयांनी जिल्हाधिकारी व मुख्य वन संरक्षकांना निवेदनातून केली आहे.
निवेदनानुसार, पदमपूर येथील जंगलातील गट क्रमांक २६४ मध्ये कंत्राटदाराकडून गिट्टी खुदाईचे काम सुरू आहे. मागील एक ते दीड वर्षापासून हे काम सुरू असून याबाबत माहिती मिळताच २३ फेब्रुवारी रोजी वन परिक्षेत्राधिकारी, वन कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांनी जंगलाची पाहणी केली. त्यात २० -२२ ट्रीप गिट्टी फोडण्यात आल्याचे दिसले. तर सुमारे १५०० ते २००० ट्रीप माल कंत्राटदाराने तेथून काढून नेल्याचेही स्थळाला बघून स्पष्ट होत होते.
विशेष म्हणजे, या गिट्टीच्या खोदकामासाठी हजारोंच्या संख्येत झाडे कापण्यात आली आहेत. दरम्यान २४ फेब्रुवारी रोजी वन विभागाने २० ट्रीप गिट्टी जप्त केली. मात्र कापलेली झाडे व झालेल्या खोदकामाबाबत कोणताही कारवाई केली नसून उलट या प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात आहे. गट क्रमांक २६४ इको सेन्सीटीव्ह झोन मध्ये येत असूनही वन कर्मचारी काहीच पाऊल उचलत नसल्याने गावकरी आश्चर्य व्यक्त करीत आहेत. तर २४ तारखेला वन परिक्षेत्राधिकाऱ्यांनी मौका चौकशी करणार असल्याचे सांगत गावकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
मात्र वन कर्मचाऱ्यांनी मोजमाप केली नाही. शिवाय कापण्यात आलेल्या झाडांचा पंचनामाही गावकऱ्यांच्या उपस्थितीत झालेला नाही. बिट गार्ड यांनी बाहेरील माणसे जंगलात नेऊन झाडांचा पंचनामा केला यावरही गावकऱ्यांचा विश्वास नाही. यातून वन परिक्षेत्राधिकारीही प्रकरणाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
करिता या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषी वन कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र मडावी, नरेंद्र गाधयने, रेखा मडावी, ईश्वर हेमणे, राजू हेमणे, घनश्याम गायधने, भारतलाल फरकुंडे, श्रीराम गायधने, छबीलाल गायधने, राधेलाल सियाम, काशिनाथ सियाम, झनकलाल सियाम, शंकर बहेकार, किशोर गायधने, भागबली सियाम व गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी तसेच मुख्य वन संरक्षकांकडे निवेदनातून केली आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: In the woods, the ballast carving started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.