‘कुटुंब नियोजना’त महिलांची आघाडी

By Admin | Updated: February 25, 2015 00:18 IST2015-02-25T00:18:51+5:302015-02-25T00:18:51+5:30

आधुनिक तंत्रज्ञान कितीही मोठ्या प्रमाणात वाढले तरी, स्त्री-पुरूष समानता आजही केवळ कागदावरच आहे. समाजात असलेल्या अनेक गैरसमजांचा पगडा ..

The women's lead in 'Family Planning' | ‘कुटुंब नियोजना’त महिलांची आघाडी

‘कुटुंब नियोजना’त महिलांची आघाडी

लोकमत विशेष
प्रशांत देसाई भंडारा
आधुनिक तंत्रज्ञान कितीही मोठ्या प्रमाणात वाढले तरी, स्त्री-पुरूष समानता आजही केवळ कागदावरच आहे. समाजात असलेल्या अनेक गैरसमजांचा पगडा आरोग्य विभागही अद्याप दूर करून न शकल्याने कुटूंब नियोजन शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट समाधानकारक असले तरी ते महिलांच्या बाबतीत म्हणायला हवे. कारण गेल्या दहा महिन्यात शस्त्रक्रिया केलेल्या जिल्ह्यातील महिलांची संख्या ३,९९५ आहे. तर, केवळ १,०८६ पुरूषांनीच शस्त्रक्रियेसाठी पुढाकार घेतला आहे. जग कितीही आधुनिकतेकडे गेले तरी पुरूषांना कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यातही कमीपणा वाटतो, हे चित्र आजही ठळकपणे दिसत आहे.
पुरूषप्रधान संस्कृतीने पुरूषांना बाहेरचे क्षेत्र जणूकाही बहाल केले होते. आणि स्त्रीने केवळ 'चूल आणि मूल' सांभाळणे एवढीच तिची जबाबदारी ठरवून दिली होती. मात्र, काळ बदलला आणि स्त्रीला तिच्या हक्कांची जाणीव होऊ लागली. त्यामुळे शिक्षणातही स्त्रीया अग्रक्रमाने येऊ लागल्या. शिक्षणामुळे स्वावलंबी झाल्याने विविध पदांवर काम करून लागल्या. काही कालावधीनंतर तर पुरूषांच्या बरोबरीने अर्थार्जन करणे, ही काळाची गरज बनली. स्त्रीने स्वत:ला सक्षम बनवत सर्व क्षेत्रात पदार्पण केले असले तरीही अजूनही निर्णयप्रक्रियेत तिला डावलले जाते. ही स्थिती ग्रामीण भागातच नव्हे तर अगदी शहरी भागातही दिसून येत आहे. म्हणूनच आज २१ व्या शतकातही लिंगभेदाचे प्रकार मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहेत. स्त्रीपुरूष समानतेचा डांगोरा समाजाने कितीही पिटला तरी आजही असमानता आहे. याचा प्रत्यय आरोग्य विभागाच्या कुटूंब कल्याण कार्यक्रमात येतो.
वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी 'कुटूंब लहान, सुख महान' चा नारा देत शासनाने कुटूंब कल्याण मोहिम राबविली. एक किंवा दोन मुलांवर शस्त्रक्रिया करणाऱ्या दांपत्याला प्रोत्साहनात्मक योजना राबविण्यास सुरूवात केली. मात्र, ही शस्त्रक्रिया केली तर पुरूष शारीरिक कष्टाची कामे करण्यात कमजोर होतो. या गैरसमजाबरोबरच समाजातील आपल्या प्रतिमेला धक्का लागेल या अहंकारामुळे पुरूष ही शस्त्रक्रिया करून घेण्यास तयार नाहीत.
खरंतर पुरूष शस्त्रक्रिया ही स्त्री शस्त्रक्रियेपेक्षा अतिशय सुलभ आणि वेदनारहित आहेत. पण ती पुरूषाला कमजोर करणारी नाही, याबाबत आरोग्य विभागाकडून पुरेसे प्रबोधनही होत आहे. एवढेच नव्हे तर प्रोत्साहनासाठी शस्त्रक्रिया करणाऱ्या पुरूषांना १,४०० रूपयांपर्यंत रक्कमही दिली जात आहे. मात्र, तरीही कुटूंब कल्याण शस्त्रक्रियेबाबत पुरूष मागे राहत आहेत. ही स्थिती ग्रामीण भागातच नव्हे तर शहरातही आहे. जिल्ह्याला ५,१३० शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट होते.
यापैकी एप्रिल ते जानेवारी या दहा महिन्याच्या कालावधीत ५,०८१ शस्त्रक्रियांची उद्दिष्टपूर्ती झाली असली त्यात ३,९९५ शस्त्रक्रिया महिलांच्या तर पुरूषांवरील शस्त्रक्रिया केवळ १,०८६ इतक्याच आहेत.
पुरूष शस्त्रक्रियेसाठी जिल्हा आरोग्य विभागाला केवळ २२० शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट दिले आहे. आरोग्य विभागाने १,०८६ जणांनी शस्त्रक्रिया करून उद्दिष्ट्यपूर्तीपेक्षा जास्त काम केले आहे. हा अपवाद वगळल्यास पुरूषांची महिलांशी तुलना केल्यास फारच अत्यल्प आहे.
वित्तीय वर्ष संपायला आता केवळ एकच महिना शिल्लक आहे. पुरूष उद्दिष्टांपैकी आतापर्यंत ८८ टक्के उद्दिष्टपूर्ती झाली आहे.
मात्र, आता उरलेल्या काळात किती उद्दिष्ट पूर्ण होईल, हे सांगता येणे कठिण आहे. आतापर्यंतच्या काळात पुरूष शस्त्रक्रियेचे प्रमाण कमी आहे. आर्थिक दुर्बल असलेले पुरूष लाभ मिळतो. म्हणून शस्त्रक्रिया करण्यात पुढे येतात. मात्र, इतरांची पुरूषी मानसिकताच आडवी येते, हे सत्य आहे. शस्त्रक्रिया करायची झाली तर ती महिलेनेच करायची, असा अलिखित नियमच पडून गेला आहे. पुरूषाला नसबंदीसाठी प्रवृत्त करण्यासाठी विविध प्रकारे जागृतीही होत आहे. पण तरीही हे प्रमाण अजून वाढलेले नाही.
मुदतठेव उपलब्ध
सावित्रिबाई फुले कन्या कल्याण योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटूंबातील एखाद्या विवाहित जोडप्याने एकच अपत्य, तेही मुलगी असताना कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे १० हजार रूपये रक्कमेची मुदतठेव उपलब्ध करून देण्यात येते. दोन मुलींच्या जन्मानंतर, मुलगा नसताना कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतली असेल तर त्या दोन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी ५,००० रूपये प्रमाणे १०,००० रूपये रक्कमेची १८ वर्षांची मदतठेव देण्यात येते.
दोन मुलानंतर पाळणा कायमचा थांबविण्यासाठी शक्यतो पतीने नसबंदी शस्त्रक्रिया करून घ्यावी.
पुरूष नसबंदी शस्त्रक्रिया ही स्त्री नसबंदी शस्त्रक्रियेपेक्षा कितीतरी सोपी आहे. बिनटाक्याची पुरूष नसबंदी शस्त्रक्रिया आता फक्त तीन मिनीटात होते.
स्त्री शस्त्रक्रिया दवाखान्यात सात दिवस भरती व्हावे लागते पण पुरूष शस्त्रक्रियेसाठी भरती होण्याची गरज नाही.तसेच शस्त्रक्रियेमुळे कमजोरी येत नाही.
पुरूष शस्त्रक्रियेत कुठलीही जखम केली जात नाही. अथवा टाके घालावे लागत नाही. त्यामुळे वेदना होत नाहीत. वैवाहिक सुख पूर्वीप्रमाणेच मिळते. पुरूषार्थ कमी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
शस्त्रक्रिया करून घेतल्याबद्दल स्त्रीला ती दारिद््रयरेषेखालील किंवा अनुसुचित जाती-जमातीची असेल तर ६०० आणि इतर प्रवर्गातील महिलांना २५० रूपये लाभ दिला जातो. मात्र, पुरूष शस्त्रक्रियेत १,५०० रूपयांचे अनुदान मिळते.

Web Title: The women's lead in 'Family Planning'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.