स्त्रियांनी मानसिक, आर्थिक व सामाजिक दृष्टीने सक्षम व्हावे

By Admin | Updated: March 30, 2015 01:17 IST2015-03-30T01:17:35+5:302015-03-30T01:17:35+5:30

मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, जिल्हा माहिती कार्यालय

Women should be able to be mentally, financially and socially capable | स्त्रियांनी मानसिक, आर्थिक व सामाजिक दृष्टीने सक्षम व्हावे

स्त्रियांनी मानसिक, आर्थिक व सामाजिक दृष्टीने सक्षम व्हावे

गोंदिया : मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, जिल्हा माहिती कार्यालय आणि श्री शारदा वाचनालय यांच्या संयुक्त वतीने श्री शारदा वाचनालयाच्या बजाज सांस्कृतिक सभागृहात आयोजित गोंदिया ग्रंथोत्सव-२०१५ अंतर्गत ‘२१ वे शतक आणि महिला सबलीकरण’ या विषयावर महाचर्चा आयोजित करण्यात आली होती. महाचर्चेमध्ये एस.एस. गर्ल्स महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. राजश्री धामोरीकर आणि प्रा. कविता राजाभोज, राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालयाच्या प्रा. सविता बेदरकर, एम.बी.पटेल महाविद्यालय देवरीच्या प्रा. डॉ. वर्षा गंगणे आणि एन.एम.डी. महाविद्यालयाचे प्रा. बबन मेश्राम यांनी सहभाग घेतला.
यावेळी डॉ. राजश्री धामोरीकर यांनी, चांगल्या संस्कारांनी आयुष्याला दिशा मिळण्यास मदत होते. स्त्री-पुरूष समानतेच्या युगात आई-वडिलांनी देखील मुलगा-मुलगी हा भेद करू नये. काळ बदलला तशी स्त्रीची भूमिकाही बदलली. ग्रंथालयातील विदूषी स्त्रिया आजही एक व्यक्ती म्हणून जगू शकत नाही. स्त्रियांनी त्यांच्या स्वसंरक्षणासाठीही सबल होणे महत्वाचे आहे, असे मत मांडले.
प्रा. सविता बेदरकर यांनी, स्त्रीने आर्थिक, सामाजिक व बौध्दिकदृष्ट्या सबल होण्याबरोबरच शारीरिकदृष्ट्या सबल होणे महत्वाचे आहे. आजही ठिकठिकाणी अपमानास्पद वागणूक व समाज कंटकांच्या विभत्स वर्तनाला सामोरे जावे लागते. २१ व्या शतकात जो समाज छाती ठोकून स्त्रीरक्षणाच्या गोष्टी सांगतो तो समाज प्रसंगी तिचे भक्षणही करतो. म्हणून शतक कुठलेही असो स्त्रीने तिच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणे आवश्यक आहे. स्त्रीरक्षणाचे कायदे स्त्रियांच्या पाठीशी आहेत. पण त्या कायद्याचा उपयोग करणे किंवा मनगटातील ताकद दाखविणे यापेक्षा आपल्या व्यवहारातून समाजाला संधी देवू नये असे मत मांडले.
प्रा. डॉ. वर्षा गंगणे यांनी, कुटुंब संस्था व समाज या एकमेकांना पुरक संस्था आहेत. चूल व मूल या संकल्पनेतून आजची स्त्री बाहेर पडली आहे. समाजातील सर्व घटकातील स्त्री अविभाज्य अंग आहे. समाजाने स्त्री विषयक विचार बदलविणे म्हणजे प्रत्येक व्यक्तीने स्त्रियांना योग्य ते स्थान देणे होय. यावेळी त्यांनी स्त्रीरक्षणावर भर दिला व विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्त्रिया सुरक्षित नसल्याचे सांगितले.
प्रा. कविता राजाभोज यांनी, निसर्गाने स्त्रीला प्रजननक्षमता प्रदान करून वेगळेपण दिले आहे. यावेळी त्यांनी ऋषी वाल्मिकी व सेंट पॉलचे स्त्रीविषयक विचार मांडले. काळाच्या ओघात स्त्रीने स्वत:ला देहस्विनी, समाजाने कुटूंबिनी बनविले. स्त्रीने दोन्ही भूमिका यशस्वीपणे निभावल्या. २१ व्या शतकातील स्त्री सबल असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रा. बबन मेश्राम यांनी आपल्या वक्तव्यातून सक्षमीकरण व सबलीकरण यातील भेद व्यक्त केला. स्त्रियांचे सबलीकरण होण्याकरिता स्त्रियांचे सक्षमीकरण होणे आवश्यक असल्याचे सांगितले. स्त्री कुटूंबाची, समाजाची जबाबदारी व कर्तव्य कधीच नाकारली नाही. पण पुरूषांनी नेहमीच स्त्रियांचे स्थान दुय्यम मानले आहे, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी मांडले. संचालन रक्त संक्रमण अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी केले. आभार माहिती सहायक पल्लवी धारव यांनी मानले. कार्यक्रमाला महिला, विद्यार्थिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Women should be able to be mentally, financially and socially capable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.