दारूबंदीसाठी सरसावल्या बाक्टी येथील महिला
By Admin | Updated: February 26, 2015 00:57 IST2015-02-26T00:57:14+5:302015-02-26T00:57:14+5:30
तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैधपणे मोहफुलाची दारू काढण्यासाठी बाक्टी (चान्ना) हे गाव गेल्या काही पिढ्यांपासून प्रसिध्द आहे.

दारूबंदीसाठी सरसावल्या बाक्टी येथील महिला
बोंडगावदेवी : तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैधपणे मोहफुलाची दारू काढण्यासाठी बाक्टी (चान्ना) हे गाव गेल्या काही पिढ्यांपासून प्रसिध्द आहे. या गावात सर्वत्र मोहफुलाची दारू सहज उपलब्ध होत असल्याने कित्येक संसाराची राखरांगोळी झाली. याला आळा घालण्यासाठी महिलांनी दारूबंदीचा निर्णय घेतला आहे.
परिसरात व्यसनाधिनतेचे प्रमाण पराकोटीला पोहचले. दारू पिणारे कर्जाच्या खाईत लोटून संसार उद्ध्वस्त झाली. याच्या उलट अवैधपणे दारू विकणारे व मोहफुलाचा व्यापार करणारे मात्र गब्बर झाले असल्याचे चित्र आजघडीला बाक्टी गावात दिसून येत आहे. दारूबाज पतिराजापासून होणाऱ्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून कित्येक कुटूंबाची ताटातूट झाली. त्यामुळे गावातील शेकडो महिला पुढे सरसावल्या. महिला शक्तीच्या प्रयत्नाला अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी सहकार्य करण्याचे धाडस दाखवल्याने गावातून मोहाफुलाची दारू हद्दपार करण्यासाठी महिलांनी अभियान राबविणे सुरू केले आहे.
यासाठी आयोजित ग्रामसभेत दारूबंदी अभियान समिती गठित करण्यात आली. त्यात अध्यक्ष इंदू शहारे, उपाध्यक्ष मंगला शेंडे, सचिव सुनिता चौधरी, सदस्य संगीता सांगोडे, शांता रोकडे, सुनिता सांगोडे, नलिनी बारापात्रे, शालिनी प्रधान, शोभा शेंडे, भारती रोकडे, अर्चना हलमारे, विद्या चाचेरे, पारबता दिघोरे, सुमित्रा मांढरे, लिला राऊत, ठमाबाई बडवाईक, उज्वला कुंदेले, कामुना हेमणे, चित्रा बोरकर, हिरा हेमणे, कमला हलमारे, जयचंद बडवाईक, आदेश बोरकर, जितेंद्र शेंडे, मोतीराम बनकर, मोतीराम शेंडे, महेंद्र राऊत, विजय बडोले आदीचा समावेश करण्यात आला आहे. समितीच्या वतीने गावात दारूबंदी अयिभान सुरू असल्याने अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणल्याचे चित्र दिसत आहे. (वार्ताहर)
५० पेक्षा अधिक लोक सक्रिय
बाक्टी या लहानशा खेडेगावात जवळपास ५० पेक्षा जास्त लोक अवैधपणे मोहाफुलाची दारू काढण्याचे काम करता असे बोलल्या जाते. सर्वाधिक जास्त एकाच समुदायाचे लोक या व्यवसायात असल्याचे सांगितले जाते. मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू सहज उपलब्ध होत असल्याने परिसरातील इंझोरी, सोमलपूर, चान्ना, बोंडगावदेवी, बोरटोला, बाक्टी, येरंडी आदी गावातील शौकिनबाजांची वर्दळ नित्यनेमाने दिसून येते.
यापूर्वी दारूबंदीसाठी प्रयत्न केल्या गेले. परंतु पाहिजे त्याप्रमाणात यश आले नाही. दारूच्या त्रासापायी कुटूंबातील महिला त्रस्त झाल्या. बाक्टी गावातील मागासवर्गीय कुटूंबातील ८४ महिलांनी ग्रामपंचायतला लेखी अर्ज देऊन गावात दारूबंदी करण्याची एकमुखी मागणी केली.
महिलांच्या अर्जावरून ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. कमला हलमारे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. सभेला अर्जुनी-मोरगाव ठाण्याचे पोलीस अधिकारी अभिषेक पाटील राजेश गज्जल, मतमुस अध्यक्ष मोतीराम शेंडे, सरपंच जितेंद्र शेंडे तसेच गावातील महिला-पुरूष बहुसंख्येनी उपस्थित होते. सभेत दारूबंदी विषयासंबधी सविस्तर चर्चा करण्यात आली. गावात कायमची दारूबंदी करण्यात यावी असा एकमुखी ठराव संमत करण्यात आला.