स्वयंसहायता बचत गटाच्या महिलांनी फुलविली टरबूज शेती
By Admin | Updated: April 18, 2017 01:12 IST2017-04-18T01:12:02+5:302017-04-18T01:12:02+5:30
ध्यास घेतला तर काहीही करता येते याचे मुर्त उदाहरण तालुक्यातील ग्राम आसलपाणी येथील जय माँ लक्ष्मी स्वयं सहायता महिला बचत गटातील महिलांनी दिले आहे.

स्वयंसहायता बचत गटाच्या महिलांनी फुलविली टरबूज शेती
स्वयंरोजगार : आता मत्स्य शेती करण्याचे नियोजन
गोंदिया : ध्यास घेतला तर काहीही करता येते याचे मुर्त उदाहरण तालुक्यातील ग्राम आसलपाणी येथील जय माँ लक्ष्मी स्वयं सहायता महिला बचत गटातील महिलांनी दिले आहे. बचतगटाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या या महिलांनी टरबूजाची शेती पिकवून मेहनत केल्यास काहीच अशक्य नसल्याचे दाखवून दिले आहे.
जय माँ लक्ष्मी स्वयं सहा. महिला बचत गटाची स्थापना स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेअंतर्गत २००६ मध्ये झाली होती. सदर गट विस्कळीत व अनियंत्रित झाले होते. मात्र गट समन्वयक जे.एम.बिसेन यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत बचतगटाचे सन २०१४ मध्ये पूनर्जीवन केले. बचत गटातील १२ महिला कुटूंबाचे कौशल्य व त्यांचेकडील उपलब्ध संसाधनांचा विचार करून आपल्या गावातील कसाऱ्या तलावाच्या पोट जमीनीवर बचतगटाच्या महिलांनी टरबूज शेती करण्याचे ठरविले.
गावातील मासेमार संस्थेने लिलावाद्वारे २० हजार रुपयांना घेतलेले तलाव बचतगटाच्या महिलांनी आपल्या हिस्याचे भाडे भरून टरबूज शेती करण्यासाठी घेतले. तलावाच्या भाड्याची रक्कम भरण्यासाठी गटातील जमा रकमेचा अंतर्गत कर्ज म्हणून उपयोग केला. बचतगटाच्या ११ महिलांनी भाड्याने (ठेक्याने) असलेली जमीन टरबूज शेती लावण्याकरीता आपसात वाटून घेतली. प्रत्येकी अर्धा एकरमध्ये टरबूजवाडी व सोबत काकडी लावलेली आहे. टरबूज बीची पेरणी माहे डिसेंबर २०१६ मध्ये करण्यात आली व मार्च शेवटी व एप्रिलमध्ये फळे विकण्यास सुरूवात झाली.
बचतगटाच्या महिलांनी केलेली टरबूज शेती बघून मन प्रसन्न होते. महिलांनी केलेल्या कामाचे चीज झाल्याचे वाटते सदर टरबूज शेतीतून प्रत्येक सहभागी कुटूंबाला खर्च वजा जाता ३० हजार रुपयापर्यंत निव्वळ नफा मिळण्याचा अंदाज आहे. म्हणजे ११ सदस्यांचे एकूण उत्पन्न तीन लाख ३० हजार होणार आहे. या उत्पन्नाचा या बचतगटाच्या गरीब कुटूंबाच्या उपजीवीकेच्या दृष्टीकोनातून त्यांच्या आवश्यक गरजा भागविण्यासाठी फार मोलाचा आधार होणार आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत आसलपाणीच्या जय मा लक्ष्मी स्वयं सहा. महिला बचत नाविण्यपूर्ण टरबूज शेती करून उत्पन्नाचे नविन स्त्रोत तयार करणारे गोरेगाव तालुक्यातील प्रथम व एकमेव गट आहे. सदर गटाच्या अध्यक्ष उषा नाईक, उपाध्यक्ष निलवंता वट्टी व सचिव पुस्तकला राऊत आहेत. यापुढे या बचतगटातील कुटूंबाचे कौशल्य लक्षात घेवून गटाद्वारे गट समन्वयक बिसेन यांच्या मार्गदर्शनात पूर्ण अभ्यास व नियोजन करून याच तलावामधील पाण्यामध्ये मत्स्य शेती करण्याचे नियोजन आहे.
जेणेकरून त्यांना अतिरीक्त उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होवू शकेल. (तालुका प्रतिनिधी)