महिला देणार शेळीपालनाचे धडे

By Admin | Updated: June 1, 2016 02:20 IST2016-06-01T02:20:57+5:302016-06-01T02:20:57+5:30

महाराष्ट्र राज्य महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे राबविण्यात येणाऱ्या शेळीपालन प्रकल्पाला वर्षभराचा कालावधी पूर्ण होत आहे.

Woman will give her a goat lessons | महिला देणार शेळीपालनाचे धडे

महिला देणार शेळीपालनाचे धडे

सालेकसा तालुक्यातील महिलांना लाभ : इतर जिल्ह्यातील महिलांनाही प्रशिक्षण
गोंदिया : महाराष्ट्र राज्य महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे राबविण्यात येणाऱ्या शेळीपालन प्रकल्पाला वर्षभराचा कालावधी पूर्ण होत आहे. यात सालेकसा तालुक्यातील ३८ गावांमधील सहा हजार महिला यशस्विपणे शेळी पालन करीत आहेत. त्यामुळे नक्षल प्रभावित सालेकसा तालुका आता राज्यातील २५ जिल्ह्यातील महिलांना शेळी पालनाचा मार्ग दाखवेल, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
सदर प्रकल्प तिरोडा तालुक्यातील ३० गावांमध्येसुद्धा यशस्विरीत्या सुरू आहे. या प्रकल्पात महिलांना शेळी पालनापासून त्यांची देखरेख, औषधोपचार, खरेदी-विक्रीचे तंत्र आदींचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच शेळी पालनासाठी त्यांना बँकेमधून कर्जसुद्धा उपलब्ध करून दिले जात आहे.
नुकतेच गोंदियामध्ये राज्यातील नागपूर, पुणे, धुळे, औरंगाबाद, अमरावती, वर्धा, गडचिरोली, ठाणे, वाशिम, लातूर, जळगाव, हिंगोली, अकोला, भंडारा, नांदेड, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, परभणी, जालना, अहमदनगर, बुलढाणा, नाशिक, नंदूरबार, बिड या जिल्ह्यातील प्रतिनिधींना सालेकसा पॅटर्नची माहिती व प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना कोलगड, ब्राह्मणटोला, सोनपुरी, पांढरी, गल्लाटोला, मारजीटोला, पिपरटोला, मरकदा गावांतील महिलांसह मुलाखतसुद्धा करवून देण्यात आली.
लखनौ येथील गोट ट्रस्टच्या प्रतिनिधींनी गोंदियात एकत्रित २५ जिल्ह्यातील प्रतिनिधींना प्रशिक्षित केले. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या या योजनेतून सालेकसा तालुक्यातील जवळपास सहा हजार महिला लाभान्वित होत आहेत. या योजनेची विशेषता म्हणजे ग्रामीण महिलांसाठीच त्यांच्या सबलीकरणासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. प्रत्येक गावात एक पशु सखी नियुक्त केली जात आहे जी गावातील सर्व शेळ्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवते. त्यामुळे शेळ्यांना होणाऱ्या आजाराची माहिती मिळते. सालेकसा तालुक्यातील महिला या योजनेमुळे आनंदित आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Woman will give her a goat lessons