‘त्या’ महिलेला हलविले नागपूरच्या मनोरुग्णालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 21:23 IST2018-12-24T21:22:47+5:302018-12-24T21:23:06+5:30
मागील वर्षभरापासून जवळील ग्राम अंभोरा येथील बसस्थानकात आश्रयाला असलेल्या मनोरूग्ण महिलेला येथील काही सामाजीक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन नागपूरच्या मनोरूग्णालयात हलविले. शकुंतला घनश्याम देवर (३५,रा. कादोकला, जि.केऊझर, ओडीसा) असे त्या महिलेचे नाव आहे.

‘त्या’ महिलेला हलविले नागपूरच्या मनोरुग्णालयात
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील वर्षभरापासून जवळील ग्राम अंभोरा येथील बसस्थानकात आश्रयाला असलेल्या मनोरूग्ण महिलेला येथील काही सामाजीक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन नागपूरच्या मनोरूग्णालयात हलविले. शकुंतला घनश्याम देवर (३५,रा. कादोकला, जि.केऊझर, ओडीसा) असे त्या महिलेचे नाव आहे.
शकुंतला ग्राम अंभोरा येथील बसस्थानकात मागील वर्षभरापासून आश्रय ेघेऊन होत्या. बसस्थानकाच्या बाजूला लहान चहाटपरी चालविणारे शाहबाज सलीमुद्दीन शेख (रा.आंभोरा) यांनी तिला जेवण दिले. परंतु तिच्या पुनवर्सनासाठी कुणाचेही हात पुढे आले नाही. अचानक सप्टेंबर महिन्यात येथील जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागातील शाखा अभियंता वासुदेव रामटेककर हे कामानिमीत्त जात असताना त्यांचे शकुंतलाकडे लक्ष गेले. त्यांनी तिला सहानुभूतीपूर्वक विचारपूस केली असता तिने आठवणीतल्या काही गोष्टी त्यांना सांगितल्या.
या आधारावर रामटेककर यांनी केऊझर (ओडीसा) येथील पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून शुकंतलाच्या घरापर्यंत माहिती पाठविली. यात तिचे वडील मरण पावले असल्याचे कळले. तर भावंडांनी आम्ही गरीब आहोत तिचा उपचार किंवा पालनपोषण करू शकत नाही असे सांगून आपले हात झटकले. यावर रामटेककर यांनी महिला व बाल कल्याण विभागाकडे अर्ज करून शासनाच्या योजनेप्रमाणे त्या महिलेचे पुनवर्सन करण्याची विनंती १९ नोव्हेंबर रोजी केली होती.
या विनंतीवरून महिला व बाल कल्याण विभागाने रावणवाडी पोलीस ठाण्यात पत्र देऊन तिची वैद्यकीय तपासणी करण्यास सांगीतले. मात्र रावणवाडी पोलिसांनी महिला व बाल कल्याण विभागाच्या पत्राकडे लक्ष दिले नाही.
अशात रामटेककर यांनी पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांच्याकडे धाव घेतली व प्रकरणाची माहिती दिल्यानंतर बैजल यांनी लगेच रावणवाडी पोलिसांना आदेश देऊन त्या महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यास भाग पाडले. त्यानुसार शनिवारी (दि.२२) शकुंतलाची वैद्यकीय तपासणी करून नागपूरच्या मनोरूग्णालयात दाखल करण्यात आले.
यासाठी पोलीस हवालदार दुबेलाल उईके, सुनील सेगोकर, सविता बिसेन व वैशाली सांदेल यांनी सहकार्य केले.
शासकीय महिला आश्रमात तिचे होणार पुनवर्सन
मनोरूग्णालयात उपचार करून तिच्या प्रकृतीत सुधार झाल्यानंतर शकुंतलाला शासकीय महिला आश्रमात पुनवर्सनासाठी ठेवले जाणार असल्याचे मनोरूग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. रामटेककर यांनी यापूर्वी रस्त्यावर अस्वस्थ आढळलेल्या चार महिलांना पुनवर्सनासाठी नागपूरला पाठविले आहे हे विशेष.