साठवण बंधारा फाटकाविना

By Admin | Updated: February 27, 2015 00:41 IST2015-02-27T00:41:15+5:302015-02-27T00:41:15+5:30

स्थानिक जिल्हा परिषद लघु पाटबंधारे उपविभागातर्फे तावशी-खुर्द येथील नाल्यावर बांधण्यात आलेल्या साठवण बंधाऱ्याला व्दार नाही.

Without stopping the storage | साठवण बंधारा फाटकाविना

साठवण बंधारा फाटकाविना

अर्जुनी-मोरगाव : स्थानिक जिल्हा परिषद लघु पाटबंधारे उपविभागातर्फे तावशी-खुर्द येथील नाल्यावर बांधण्यात आलेल्या साठवण बंधाऱ्याला व्दार नाही. त्यामुळे बांधकाम पूर्ण होऊनही पाणीच अडवले जात नाही. या विभागातर्फे पाणी अडवा, पाणी जिरवा या धोरणाची ऐशीतैशी होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, तावशी-खुर्द येथील नाल्यावर २०१३-१४ या वर्षात साठवण बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. यावर ७ लक्ष ५ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला. या साठवण बंधाऱ्याची जिवंत साठवण क्षमता ०.०२५ द.ल.घ.मी. आहे. यामुळे १०.५० हेक्टर शेतजमिनीला सिंचन होणार आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा या धोरणांतर्गत शासनाने विविध नाल्यांवर बंधाऱ्याचे बांधकाम करून पाणी अडविण्याचे धोरण स्विकारले आहे. मात्र प्रशासनाच्या भ्रष्ट कार्यप्रणाली व उदासीनतेमुळे शेतकऱ्यांची कुचंबना होत आहे. हा बंधारा २०१३-१४ या वर्षातील आहे. प्रशासनाकडून २०१४ मध्येच बांधकाम पूर्ण झाल्याचे दर्शविण्यात आले आहे. मात्र या बंधाऱ्यावर व्दार बसविण्यात आले नाही. याच वर्षात सायगाव-१, पांढरवाणी माल, गुढरी-३, तावशी, रांजीटोला, नवनितपूर २, गंधारी ३ येथील नाल्यावर बंधाऱ्यांचे बांधकाम पूर्ण झाले. या बंधाऱ्यांच्या बांधकामावर सुध्दा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
इटियाडोह धरणाच्या कालव्यातून झिरपणारे पाणी तसेच इतर स्त्रोतातून तावशी नाल्यात पाणी जमा होता. पाणी अडविल्यामुळे परिसरातील शेतीला सिंचन होईल हा उदात्त हेतू होता. मात्र याठिकाणी व्दार का बसविण्यात आले नाही हे न उलगडणारे कोडे आहे.
संबंधित विभागाच्या अभियंत्याशी चर्चा केली असता व्दार बसवायचे आहे. मात्र कंत्राटदाराने ते बसवून दिले नाही. मी त्यांच्याकडे ही मागणी केली. आठवडाभरात दार बसविण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र महिना लोटूनही व्दार बसविण्यात आले नाही.त्यामुळे या बंधाऱ्यातून वर्षभरापासून पाणी वाया जात आहे. ७ लक्ष रुपये खर्च करूनही नजीकच्या शेतजमिनीला सिंचन होत नाही. या बंधाऱ्यावर तातडीने व्दार बसवून शेतीला सिंचन व्हावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
बंधाऱ्याच्या कडेला दगडांची पिचींग केलेली असते. या बंधाऱ्यावर पिचींग सुध्दा केलेली दिसून येत नाही. एकूणच या बंधाऱ्याच्या बांधकामाची गुणवत्ता कशी आहे याची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Without stopping the storage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.