दोन दिवसात ६२ लोकांचा अवयवदानाचा संकल्प
By Admin | Updated: September 2, 2016 01:37 IST2016-09-02T01:37:18+5:302016-09-02T01:37:18+5:30
आरोग्य विभागाकडून ३० ते १ सप्टेंबरदरम्यान राबविण्यात आलेल्या महाअवयवदान अभियानामुळे नागरिकांमध्ये बरीच जागृती आली आहे.

दोन दिवसात ६२ लोकांचा अवयवदानाचा संकल्प
अभियानाचे यश : अनेकांना मिळणार जगण्याची संधी
गोंदिया : आरोग्य विभागाकडून ३० ते १ सप्टेंबरदरम्यान राबविण्यात आलेल्या महाअवयवदान अभियानामुळे नागरिकांमध्ये बरीच जागृती आली आहे. या दोन दिवसात ६२ लोकांनी अवयवदानाचा संकल्प केला. गुरूवारी दुपारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात या अभियानाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात आला. मात्र अवयवदानासाठी नोंदणीचे काम पुढेही सुरू राहणार आहे.
मानवाला डोळे, यकृत, हृदय व मूत्रपिंड यासारख्या अवयवांची दिलेली अवयवरूपी भेट ही मृत्यूनंतरही दुसऱ्या गरजू रुग्णांना दान करता येवू शकते व मृत्यूशय्येवर असलेल्या रूग्णांना अवयवदानामुळे दुसरे नवजीवन जगण्याची संधी मिळू शकते, असे मार्गदर्शन समारोप कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, प्रा.डॉ.व्ही.पी.रूखमोडे, प्रा.डॉ.मकरंद व्यवहारे, डॉ.सुगन, सनदी लेखापाल जैन यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.सूर्यवंशी म्हणाले, अवयवदानाचे महत्व जाणून रुग्णसेवेसाठी राज्यभर हे अभियान राबविण्यात आले. अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. ‘मरावे परी अवयवदानरूपी उरावे’ असेच म्हणावे लागेल. मृत्यूनंतर आपल्या शरीरावर आपला काहीच अधिकार राहत नाही, ते मातीमोल असते. परंतू अवयवदानामुळे आपण मृत्यूनंतरही एका नवीन व्यक्तीला जीवनदान देवू शकतो, असेही त्यांनी सांगितले.
गोंदिया जिल्हा निसर्गसंपन्न असल्याचे सांगून डॉ.सूर्यवंशी म्हणाले, जिल्ह्यात वनसंपदा व जैवविविधता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे जिल्ह्यात पर्यटनाला मोठ्या प्रमाणात वाव आहे. आपल्या कारकिर्दीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाले याचा आपल्याला अभिमान असून या महाविद्यालयाचे जिल्ह्याच्या विकासात महत्वपूर्ण योगदान राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ.केवलीया व डॉ.पातुरकर यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करु न पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला डॉ.सुवर्णा हुबेकर, डॉ.सुरेखा मेश्राम, डॉ.तोटे, डॉ.श्रीखंडे, डॉ.जयस्वाल, सविता बेदरकर यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक, जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, गोंदिया शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन डॉ.संगीता भलावी यांनी तर आभार डॉ.प्रवीण जाधव यांनी मानले.(जिल्हा प्रतिनिधी)
रांगोळी,पोस्टर्समधून जनजागृती
यावेळी ‘अवयवदान महान कार्य’ या विषयावरील व्याख्यानातून डॉ.मकरंद व्यवहारे, डॉ.सुगन व जैन यांनी मार्गदर्शन केले. यानिमित्ताने निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात प्रावीण्य मिळविलेल्या गोंदिया शहरातील निर्मल इंग्लिश हायस्कूल, मनोहर म्युनिसीपल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, मारवाडी विद्यालय, एस.एस.गर्ल्स कॉलेज, जे.एम.ज्युनियर कॉलेज, डी.बी.सायंस कॉलेज, एस.एस.ए.एम.गर्ल्स हायस्कूल व सरस्वतीबाई महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.