महिनाभरात खनिज चोरीत एक लाखाचा दंड वसूल
By Admin | Updated: December 24, 2014 23:02 IST2014-12-24T23:02:48+5:302014-12-24T23:02:48+5:30
सालेकसा येथे तहसीलदार म्हणून रूजू झालेले परीविक्षाधीन उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी आपल्या पदाचा प्रभाव दाखवित गौण खनिजाची अवैध वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरधारकाकडून

महिनाभरात खनिज चोरीत एक लाखाचा दंड वसूल
सालेकसा: सालेकसा येथे तहसीलदार म्हणून रूजू झालेले परीविक्षाधीन उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी आपल्या पदाचा प्रभाव दाखवित गौण खनिजाची अवैध वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरधारकाकडून एका महिन्यात १ लाख १ ते ५ रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामुळे शासनाला राजस्वात वाढ झाली आहे. दुसरीकडे तालुक्यात अवैधरित्या रेती, गिट्टी, विटा आदि गौण खनिजाची वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि मॅटाडोरधारकांवर वचक निर्माण झाला आहे.
राजकीय प्रभाव दाखवून अवैध खोदकाम करणाऱ्या व वाहून नेणाऱ्या वाहनधारकाचे सुध्दा धाबे या कारवाईमुळे दणाणले आहेत. सालेकसा तालुक्यात मागील अनेक वर्षापासून वाळूमाफीयांच्या बोलबाला राहीला आहे. कोणत्याही अधिकाऱ्याला न जुमानता व नियमांची पायमल्ली करून दिवसा नाहीतर रात्री जेव्हा डाव मिळाला तेव्हा रेती घाटावर ताव मारून अवैध उत्खनन करणे व दबंगगिरी दाखवित वाहतुक करणे हे काम मोठ्या प्रमाणावर चालत राहिले. त्याचबरोबर सबंधीत अधिकारी लोक ही मॅनेज होऊन किंवा राजकीय दबावात येवून हात बांधून राहत होते.
दोन वर्षापूर्वी तहसीलदार शीतलकुमार यादव म्हणून सालेकसा येथे कार्यरत झाल्यानंतर त्यांनी तालुक्यातील दबंगशाहीवर अंकुश घालण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता. त्याचबरोबर प्रत्येकाशी समन्वय साधून सलोख्याचे वातावरण सुध्दा निर्माण केले होते. जनसामान्याचे काम वेळेवर व्हावे याकडे लक्ष देत होते. परंतु तालुक्यात कामाची गती रुळावर आली असतानाच त्यांची येथून बदली करण्यात आली आणि त्याच जागी जी.एन. खापेकर आले. त्यामुळे तालुक्यात पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ झाली होती. लोकांच्या कामावर परिणाम झाला, त्याच बरोबर शासनालाही भुर्दंड बसू लागला.
आता एक महिन्यापूर्वी गोंदिया जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी म्हणून रूजू झालेले सुनिल सुर्यवंशी यांना सहा महिन्याच्या परिविक्षाधिन कालावधीसाठी शासकीय कामाचा अनुभव घेण्यास सालेकसा येथे तहसीलदार म्हणून जवाबदारी सोपविण्यात आली. सुर्यवंशी नव्या दमाने पदावर रूजू होताच आपल्या कामाचा ठसा उमटविण्याचा प्रयत्न केला. स्वत: दररोज वेळेपूर्वी आॅफीसात उपस्थित राहात होते. प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या कामकाजाकडे लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावून कामकाज बघणे सुरू केले. त्याच बरोबर तालुक्यात अवैधरित्या गौण खनिजाचा गैरवापर व नियमबाह्य कामावर आळा घालण्याचे काम करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली.
सुरूवातीला त्यांनी एका ट्रॅक्टर धारकावर एफआयआर सुध्दा दाखल केला, परंतु त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की एफआयआर दाखल झाल्यानंतर ट्रॅक्टरच्या भरवशावर जाणारे ड्रायव्हर आणि हमालावर घरी बसण्याची नामुष्की येते. म्हणून ट्रॅक्टरधारकावर मालाच्या किंमतीपेक्षा तीन पट दंड वसूल करून त्या ट्रॅक्टरला सोडून देणे त्यांनी सुरू केले.
तहसीलदारांच्या पारदर्शी व बेधडक कारवाईमुळे एकट्या डिसेंबर महिन्यातच तीन आठवड्यात वैद्य आणि अवैध दोन्ही मिळून केलेल्या कामावर ३ लाख ३४ हजार ५५० रुपयाचा महसूल गोळा झाला आहे. त्याचबरोबर कामात सुरळीतपणा आला असून दबंगगिरी दाखवणारे ट्रॅक्टरधारक अवैधरित्या वाळू आदीची तस्करी करण्यात मोठ्या प्रमाणावर अंकुश लागला आहे. मात्र हे सतत कायम राहील का असा प्रश्न सुध्दा काहीच्या मनात निर्माण होत आहे. (प्रतिनिधी)