चार दिवसांतच विरले स्वच्छता अभियान
By Admin | Updated: October 8, 2014 23:27 IST2014-10-08T23:27:21+5:302014-10-08T23:27:21+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाचे निमित्त साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान ही संकल्पना देशवासीयांपुढे मांडली. या संकल्पनेला देश पातळीवरून चांगला

चार दिवसांतच विरले स्वच्छता अभियान
कार्यालयात पुन्हा कचरा : कर्मचारी आपल्या कामात व्यस्त
गोंदिया: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाचे निमित्त साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान ही संकल्पना देशवासीयांपुढे मांडली. या संकल्पनेला देश पातळीवरून चांगला प्रतिसादही मिळाला. येथील शासकीय कार्यालयांनीही हिरीरीने यात भाग घेत कार्यालयांत अभियान राबवून टाकले. मात्र अनेक कार्यालयात हे स्वच्छता अभियान केवळ त्या दिवसापुरतेच मर्यादित राहिले. पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली आहे.
स्वच्छ भारत अभियानाची ही संकल्पना कायमस्वरूपी रहावी हे अपेक्षित होते. त्यासाठीच सर्व कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथही देण्यात आली. मात्र येथील शासकीय कार्यालयांत फेरफटका मारल्यावर चार दिवसांतच स्वच्छता अभियान हवेत विरल्याचे बघावयास मिळाले. कार्यालय परिसरात कचरा दिसू लागला असून हे अभियानही अन्य अभियानांप्रमाणेच फक्त ‘चार दिन की चांदनी’ ठरल्याचे दिसले.
स्वच्छतेबाबत कुणाला समजावून सांगण्यापेक्षा स्वत: पासून त्याल सुरूवात करावी या उद्देशातून पंतप्रधान मोदींनी स्वच्छ भारताचे स्वप्नसाकारण्यासाठी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. त्यांच्या या अभियानांतर्गत प्रत्येकाने आपल्या घरासह परिसर व कार्यस्थळालाही स्वच्छ ठेवावे व त्यासाठी दिवसातले काही तास स्वच्छतेवर घालवावे अशी ही संकल्पना होती. सर्वांनीच त्यांच्या या संकल्पनेला दाद दिली व यात शाळा तसेच शासकीय कार्यालयांनीही हिरीरीने भाग घेतला. स्वच्छतेसाठी वरिष्ठ अधिकारीही हातात झाडू घेऊन सफाईसाठी सरसावल्याचे बघावयास मिळाले.
मात्र अभियानाचे चार दिवस लोटल्यानंतर कार्यालयांत डोकावून बघितल्यावर तिच स्थिती बघावयास मिळाली. कार्यालय परिसरात कचरा व घाणीचे ढिगार आढळून आले. तर काही कार्यालयांत प्लास्टीकचे कप व रिकाम्या बाटल्याही दिसून आल्या. यातून सफाई न झाल्याची साक्ष मिळाली. एकंदर चार दिवसांतच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छता अभियानाला बगल दिल्याचे दिसले. गोंदिया शहराची तशी खासीयत आहेच. येथे एखाद्य नवीन वस्तूला डोक्यावर धरले जाते व काही दिवसांनी त्याकडे ढुंकून पाहणारे कुणी दिसत नाही. तसलाच काहीसा प्रकार स्वच्छता अभियानाच्या बाबतीत घडला आहे. शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेही निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. अशात त्यांनीही आणखी डोकेदुखी कशाला म्हणूनच एका दिवसातच समाधान मानून घेतल्याचे बोलले जात आहे. (शहर प्रतिनिधी)