Will make a sweet and satisfying career | आवाजातील गोडवा संतोषीचे करिअर घडविणार
आवाजातील गोडवा संतोषीचे करिअर घडविणार

ठळक मुद्देदिवसभर होती अंधाराचीच साथ : वैफल्यग्रस्त जीवनावर मात करण्यासाठी आटापिटा

नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणा : ‘मेरा गाना नही है गाने को, वह है मंजील पाने को’ हे राष्ट्रसंतांचे ‘लहरकी बरखा’ मधील वाक्य आमगावातील संतोषीच्या जीवनावर खरे उतविणारे आहे. दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या संतोषीच्या आवाजात गोडवा आहे. त्या गोडव्यातून ती तिचे करीअर घडविणार आहे. आवाजाचे देणं लाभलेली ही गान कोकिळा आमगाव येथील रामचंद्र मेंढे यांच्या तीन कन्येत मधातली आहे.
शेती करणाऱ्या अशिक्षीत मेंढे दांम्पत्याने संतोषीला जन्माला घातले तेव्हा ते दुसरीही मुलगी जन्माला आली म्हणून नाखूश होतेच. त्यातच भर पडली ती म्हणजे डॉक्टरांनी सांगितले की, ही जन्मत: अंध आहे. तेव्हा आई-वडिलांच्या पाया खालची जमीन सरकली. गरीब घरी अशिक्षित आई बापाच्या पोटी जन्माला आलेली अंध मुलगी केवढा मोठा प्रश्न? काय करायचे? आई-वडिलांनी थोडाफार उपचार करण्याचा प्रयत्न केला. पण डॉक्टरांनी सांगीतले की ही कधीच बघू शकणार नाही. तेव्हा आहे त्या परिस्थितीचा त्यांनी स्वीकार केला. मजूर कुटुंब किती दिवस मुलीची काळजी घेत घरी बसून राहणार. छोट्या संतोषीला घरात एकटे ठेवून सर्व जण आपापल्या कामावर जायला लागले.
संतोषी दिवसभर घरात एकटीच राहायची. आपल्या काळ्याकुट्ट अंधाराला कवटाळून ती दिवस काढायची. दिसायचे काहीच नाही, आवाज यायचे व त्यांच्या आधाराने दिवस काढायची. कुणीतरी येईल व मला घेईल या आशेवर ती राहायची. एकटेपणामुळे ती स्वत:ला चालवायची. मोठ्याने किंचाळायची. आई-वडिलांना वाटायचे की ती अंध तर आहेच पण आता गतीमंद पण आहे. त्यामुळे तिला आता घरात अधिकच बंधीस्त करू लागले. तिला कुठेच बाहेर काढले जात नव्हते. परिसरातील लोक फारसे शिकलेले नसल्याने त्यांना संतोषी बद्दल काय करायला हवे ते कळत नव्हते. लहानगी संतोषी आपली अंधारकोठाडीत गुन्हा नसताना नरकयातना भोगत होती.
अशात अंगणवाडी सेविकेसोबत विशेष शिक्षिका उके या संतोषीसाठी आशेचा किरण बनून आल्यात आणि संतोषीचे सुरवातीला अनौपचारिक शिक्षण सुरू झाले. उके यांनी संतोषीच्या आई वडिलांचे समूपदेशन केले. सर्व शिक्षा अभियानची सर्व चमू तिच्या मदतीला धाऊन आली. सर्व विशेष शिक्षकांच्या परिश्रमाचे फळ म्हणजे संतोषीचा प्रवेश आमगावच्या जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत करण्यात आला. दोन्ही डोळ्यांना दृष्टीदोष व सर्वांना गतीमंद वाटणारी संतोषी शाळेत जाऊ लागली. इतर सामान्य विद्यार्थ्यांच्या सोबत सामान्य विद्यार्थी झाली.
विशेष शिक्षकांच्या सहकार्याने ब्रेल लिहू व वाचू लागली. ब्रेल केन, ब्रेल किटच्या मदतीने तिचे शालेय जीवन सुसह्य झाले. सहशालेय उपक्र मात आवडीने भाग घेणारी संतोषी गाण्यात अग्रेसर होती. सुरेख आवाज असणारी संतोषी शाळेतील प्रत्येक व्यक्तीची आवडीची झाली.
प्राथमिक शिक्षण पूर्ण करून संतोषीने आदर्श विद्यालयात इयत्ता ५ वीत प्रवेश घेतला. आता ब्रेल किट सोबत तिला अभ्यासक्र माच्या सीडी आणि डी.सी.प्लेवर देण्यात आले. तिच्या परिश्रमाचे फलित की इयत्ता दहावीत तिने ७२ टक्के गुण मिळविले. आता त्याच महाविद्यालयात ती बारावीला आहे.
संतोषीने या दरम्यान नाशिकला जावून तीन महिन्यांचा एमएससीआयटीचा अंधासाठी उपयोगी होईल असा संगणक कोर्स पण पूर्ण केला. गायनाच्या पाच परीक्षा तिने यशस्वी पणे पूर्ण केल्यात. संगीत विशारद होण्याचे तिचे स्वप्न आहे. सध्या बारावीची तिची जोरदार तयारी सुरू आहे. पुढे आयुष्यात संगीतात करीयर करायचे ती स्वप्न बाळगत आहे.

निराश, हताश, वैफल्यग्रस्त व्यक्तींना प्रेरणा देणारी व्यक्ती म्हणजे संतोषी आहे. ‘मन में चाह हो तो, राह निकाल ही आती है’ असे मूर्र्तीमंत उदाहरण म्हणजे आमगावातील संतोषी रामचंद्र मेंढे ही आहे. अंधाºया कोठडीतच माझा अंत होणार तर नाही अशी भीती असणारी संतोषी आज करिअर घडविण्याच्या प्रयत्नात आहे.
-डॉ. किरण धांडे
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया

Web Title: Will make a sweet and satisfying career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.