लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस मिळावा यासाठी धान उत्पादक क्षेत्रातील आमदारांनी मंगळवारी (दि. २८) महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित करीत सभागृहाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. दरम्यान, सभागृहात आमदार सुधीर मुनगंटीवार, विनोद अग्रवाल, आशिष जायस्वाल, विजय रहांगडाले, किशोर जोरगेवार, कृष्णा गजबे यांनी शेतकरी बांधवांसाठी घोषणाबाजी करत शेतकरी बांधवांना न्याय देण्याची विनंती केली. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याऐवजी त्यांच्या खात्यात डीबीटी योजनेच्या माध्यमातून थेट पैसे जमा करणार असल्याचे आश्वासन सभागृहात आमदारांना दिले. विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याबाबतचा मुद्दा अनेक आमदारांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली. अनेकदा मूळ धान उत्पादक शेतकऱ्यांना पैसे जाण्याऐवजी ते व्यापारी वर्गाकडे जातात. आसपासच्या राज्यातही धानाला बोनस दिला जातो. मात्र, त्याराज्यातील धानही आपल्या राज्यात येते आणि ते पण बोनसचा फायदा घेतात. याकडेही ना. अजित पवार यांनी लक्ष वेधले. बाहेरच्या राज्यातील धान येऊन आपल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये, त्यांचा फायदा व्हावा यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांची बैठक घेतली असल्याचे अजित पवार सभागृहात सांगितले. या सगळ्याचा विचार करून महाविकास आघाडी सरकारने डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट खात्यात पैसे मिळवून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जे खरे धान उत्पादक आहेत त्यांना पैसे मिळतील. त्यांच्या नावाखाली सुरू असलेली दुकानदारी फार मोठी आहे. याचा विचार मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली झाला असल्याचे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले. दरम्यान, धानाला बोनस मिळालाच पाहिजे अशा घोषणेने विधानभवन दणाणून सोडणाऱ्या धान उत्पादक क्षेत्रांतील आमदारांनी उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.