मजुरीपासून विधवा आजही वंचित
By Admin | Updated: February 20, 2017 00:51 IST2017-02-20T00:51:46+5:302017-02-20T00:51:46+5:30
तिरोडा तालुक्याच्या खोपडा (बयवाडा) येथील एका विधवा महिलेने मागील वर्षी २०१६ मध्ये केलेल्या मग्रारोहयोच्या कामाची मजुरी आजही मिळाली नाही.

मजुरीपासून विधवा आजही वंचित
सरपंचाची मनमानी : १५० रूपये न दिल्याने कामावर घेण्यास टाळाटाळ
काचेवानी : तिरोडा तालुक्याच्या खोपडा (बयवाडा) येथील एका विधवा महिलेने मागील वर्षी २०१६ मध्ये केलेल्या मग्रारोहयोच्या कामाची मजुरी आजही मिळाली नाही. सरपंच व रोजगार सेवक सहकार्य करण्याऐवजी धमकावणी देत असल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.
ताराबाई वासुदेव वासनिक (५०) असे त्या पीडित महिलेचे नाव आहे. तिने फेब्रुवारी ते जून २०१६ पर्यंत खोपडा-येडमाकोट-सिल्ली रस्त्याचे काम, ईसापूर तळ्याचे काम, ईसापूर-खोपडा रस्त्याचे काम केले आहे. परंतु आज वर्षभराचा कालावधी लोटल्यावरही तिला केलेल्या कामाची मजुरी मिळाली नाही.
ताराबाईने सांगितले की, आपला कोणी आधार नाही. परिस्थिती दयनिय असून आपल्याचा कुणाचे सहकार्य मिळत नाही. तेथील सरपंच तुझे पैसे खाल्ले का, अशा शब्दात बोलतो. रोजगार सेवक शिवा सुखदेव जगनाडे म्हणतो की, तुझा कोणी आधार नाही. त्यामुळे कोठेही जाशिल तरी वेतन मिळणार नाही, असे ताराबाईने सांगितले.
तिने दिलेल्या माहितीनुसार, रोजगार सेवक व सहायक अभियंता मिळून मजुरी अधिक काढून देणार, असे सांगितल्याने दरदिवस १० रूपये याप्रमाणे आपण आठवड्याला त्यांना जवळचे पैसे देत होतो. हे पैसे गँगमेटद्वारे दिले जात होते. मागील वर्षाची मजुरी मिळाली नाही. यासाठी रोजगार सेवक, सरपंच यांच्यासह मुंडीकोटा बँकेच्या व्यवस्थापकांकडे खात्यात मजुरी जमा झाली की नाही, हे विचारण्यास गेली असता नकारात्मक उत्तर देण्यात आले. या प्रकारामुळे सदर विधवा महिलेवर उपासमारीची पाळी ओढवते.
ताराबार्इंनी लोकप्रतिनिधींकडेही धाव घेतली. माजी आ. दिलीप बन्सोड यांच्याजवळ आपली व्यथा सांगितली. त्यांनी विस्तार अधिकारी कांबळे यांच्याशी बोलून सदर महिलेची समस्या सोडवावी, असे सांगितले.
यावर सदर प्रकरणाची तक्रार आपल्या कार्यालयाला उपलब्ध झाली नाही. तक्रार येताच दखल घेतली जाईल, असे आश्वासन कांबळे यांनी दिले. (वार्ताहर)
आपल्याकडे मागणी करण्यात आली नाही. ग्रामसेवक व रोजगार सेवक यांनी तक्रार नोंदविणे गरजेचे होते. वेतन आॅनलाईन असल्याने अशी परिस्थिती निर्माण होत आहे.
-सतीश कांबळे,
विस्तार अधिकारी, (मग्रारोहयो), तिरोडा.