आमच्या पोटावर लाथ कशाला मारता हो?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:29 IST2021-04-08T04:29:03+5:302021-04-08T04:29:03+5:30
मुन्नाभाई नंदागवळी बाराभाटी : मागील वर्षीपासून कोरोनाचा संसर्ग सुरु आहे. कोरोनाच्या नावाखाली शासनाच्या अनेक योजना,आर्थिक सहाय्य व ...

आमच्या पोटावर लाथ कशाला मारता हो?
मुन्नाभाई नंदागवळी
बाराभाटी : मागील वर्षीपासून कोरोनाचा संसर्ग सुरु आहे. कोरोनाच्या नावाखाली शासनाच्या अनेक योजना,आर्थिक सहाय्य व बेरोजगारी वाढली आहे. अशातच वयोवृद्ध, अपंग, विधवा, श्रावणबाळ व रोजगार हमी या योजनांचा लाभच मागील नऊ महिन्यांपासून लाभार्थ्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे. लाभार्थी तहसील कार्यालयाच्या पायऱ्या झिजवून थकले, पण मानधन मिळाले नाही. त्यामुळे आमच्या पोटावर लाथ कशाला मारता हो असा सवाल लाभार्थ्यांनी केला आहे.
कोरोनाचा काळ हा सामान्य नागरिकांसाठी घातक झाला आहे. अशा परिस्थितीत मंत्री, खासदार, आमदार, अधिकारी व कर्मचारी यांना मात्र वेतन नियमित मिळत आहे. यांच्यासाठी निधी असते, पण सामान्य नागरिक, कंत्राटीवर तत्वाचे कर्मचारी व इतर लाभार्थी यांच्यासाठी निधीच राहत नाही, का हा देखील प्रश्नच आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यात अनेक काम होत नाही. लोकप्रतिनिधी यांचे मतदार बांधवांकडे लक्षच जात नाही, पण निवडणुका आल्या की मात्र बॅनर, पोस्टरचा धडाका सुरु होतो. ही गंभीर बाब कुणालाच कळत नसावी असा प्रश्न नेहमी नागरिक उपस्थित करीत आहे. मागील नऊ- दहा महिन्यांपासून विधवा महिलांना मानधन नाही, अपंग लाभार्थ्यांना मानधनाचा लाभ मिळत नाही, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी पायपीट करुन थकले पण त्यांच्या बँक खात्यात अद्यापही मानधनाची रक्कम जमा झाली नाही. हाताला काम नाही तर निराधारांनी जगावे कसे? मानधन मिळावे म्हणून उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसीलदारांना निवेदन दिले पण त्याचा कसलाच उपयोग झाला नाही.
------------------
जवळपास एक वर्ष होत आहे, आम्हाला वृद्धापकाळ योजनेचे मानधन मिळत नाहीत. सहा सहा महिने, एक एक वर्ष पैसे जमा होत नाही. यामुळे औषध पाण्याचा खर्च काेठून करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- गोपीचंद वैद्य, श्रावणबाळ योजना लाभार्थी, येरंडी-देवलगाव
===========
वृद्धापकाळ योजनेचे मानधन आले का म्हणून तहसील कार्यालयात वारंवार जाऊन थकलो, पण अद्यापही मानधन मिळाले नाही.
- आसाराम डोमा मेश्राम, वयोवृद्ध लाभार्थी
=============
तहसील कार्यालयात वारंवार जाऊन मानधनाबाबत विचारणा केली असता ते मानधन जमा होईल असे उत्तर देतात. पण अद्यापही मानधन जमा झाले नाही.
- वंदना महादेव बडोले, विधवा लाभार्थी.
==========
काही नागरिकांच्या समस्या असतील,पण बहुतेक नागरिकांच्या खात्यावर मानधन दिले व सुरु आहेत. अडचणी असल्यास तपासणी करता येईल.
- शिल्पा सोनाले, उपविभागीय अधिकारी, अर्जुनी मोरगाव.
==========
गोठणगाव, नवेगावबांध व माहूरकुडा क्षेत्रातील लोकांचे मानधनाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, त्याची प्रक्रिया सुरु आहे. रोजगार हमीचे ही प्रश्न लवकरच आढावा बैठक घेऊन मार्गी लावण्यात येतील.
- मनोहर चंद्रिकापूरे, आमदार तथा अध्यक्ष रोजगार हमी योजना.