कोण घेणार ‘त्या’ युवतीची जबाबदारी?
By Admin | Updated: December 23, 2015 02:22 IST2015-12-23T02:22:53+5:302015-12-23T02:22:53+5:30
तीन वर्षांपूर्वी घडलेल्या ‘निर्भया कांडा’ची भीती आतासुद्धा समाजात कायम आहे. त्यावेळी त्या कांडाचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींला अटक करण्याच्या...

कोण घेणार ‘त्या’ युवतीची जबाबदारी?
पोलीस विभागापुढे पेच : सामाजिक संघटनांसह डॉक्टरही झाले असंवेदनशील
गोंदिया : तीन वर्षांपूर्वी घडलेल्या ‘निर्भया कांडा’ची भीती आतासुद्धा समाजात कायम आहे. त्यावेळी त्या कांडाचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींला अटक करण्याच्या मागणीसाठी गोंदियातील अनेक संघटना उतरल्या रस्त्यावर होत्या. पण गोंदियातील एका असहाय युवतीला आश्रय देण्यासाठी मात्र कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही.
येथील केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल एका युवतीच्या प्रकरणात सध्या पेच निर्माण झाला आहे. मानसिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या या युवतीवर कोणताही वाईट प्रसंग ओढवू नये म्हणून तिचे योग्य संगोपन करण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेण्याची गरज आहे. मात्र यातून रुग्णालयाचे डॉक्टर आणि पोलीसही अंग काढून घेत आहेत. त्यामुळे सामाजिक संघटना किंवा महिला व बालकल्याण विभाग तरी याकडे लक्ष देईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
१९ डिसेंबर रोजी गणेशनगर गोंदिया येथे आढळलेल्या एका मनोरूग्ण युवतीला शहरातील केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. २५ वर्षे वयाची ही युवती गणेशनगर येथे रस्त्याच्या बाजूला पडून होती. ती बडबड करीत होती व येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना पाहून हसत होती. त्या युवतीसह काही अघटित घडू नये यासाठी लोकांनीच तिला रूग्णालयात भरती केले.
आता रूग्णालयातही आणखी किती दिवस ठेवावे? असा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे त्या युवतीला येथून नेण्यात यावे, अशी सूचना रूग्णालयाच्या वतीने पोलिसांना देण्यात आली. मात्र तिला कुठे नेवून सोडावे? असा प्रश्न पोलीस विभागाला पडला आहे. जर तिच्याशी काही अघटित घडले तर त्यासाठी पोलीस विभागालाच जबाबदार धरले जाईल, अशी भिती त्यांना आहे.
विशेष म्हणजे गणेशनगरमधूनच मागील दिवसांत कारंजा येथील रहिवासी एका किशोरवयीन मुलीचे अपहरण करून दुष्कर्म करण्यात आल्याची घटना ताजी आहे. (प्रतिनिधी)
संवेदनाहीन कुटुंबीय
रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले की, सदर युवती काहीही बोलत नाही. कुणीही बोलले तर ती केवळ स्मितहास्य करते. या युवतीला भेटण्यासाठी कुणीतरी इसम रूग्णालयात येत होता, पण तो कोण आहे? याबाबत कुणालाही काहीही माहीत नाही. त्या व्यक्तीनेसुद्धा आपली ओळख लपवून ठेवली. त्या युवतीच्या हातावर काहीतरी गोंदलेले आहे. परंतु ते स्पष्टपणे समजून येत नाही.