जि.प.तील युती तोडण्याचा निर्णय घेणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 06:00 AM2019-11-28T06:00:00+5:302019-11-28T06:00:21+5:30

एकूण ५३ सदस्यीय जि.प.मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे २०, काँग्रेसचे १६ आणि भाजपचे १७ सदस्य असे पक्षीय बलाबल आहे. पक्षीय बलाबल पाहता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोघेही एकत्र येऊन जि.प.मध्ये सत्ता स्थापन करु शकले असते. मात्र केवळ स्थानिक पातळीवरील राजकारण आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी साडेचार वर्षांपूर्वी भाजपशी अभद्र युती करुन सत्ता स्थापन करण्याचा मार्ग अवलंबिला.

Who will decide to break the Alliance in ZP? | जि.प.तील युती तोडण्याचा निर्णय घेणार कोण?

जि.प.तील युती तोडण्याचा निर्णय घेणार कोण?

Next
ठळक मुद्देसहा महिन्यांसाठी होणार का सत्तापालट? राजकीय घडामोडींचा आगामी निवडणुकांवर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्रातील सत्ताकारणात झालेल्या उलटफेरीचा परिणाम जिल्ह्यातील राजकारणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली. गुरूवारी (दि.२८) नव्या सरकारचा शपथ विधी होणार आहे. या सर्व घडामोंडीचा परिणाम गोंदिया जि.प.तील भाजप आणि काँग्रेस यांच्या अभद्र युतीवर होणार काय,ही अभद्र युती तोडण्याचा निर्णय नेमका घेणार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.
एकूण ५३ सदस्यीय जि.प.मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे २०, काँग्रेसचे १६ आणि भाजपचे १७ सदस्य असे पक्षीय बलाबल आहे. पक्षीय बलाबल पाहता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोघेही एकत्र येऊन जि.प.मध्ये सत्ता स्थापन करु शकले असते. मात्र केवळ स्थानिक पातळीवरील राजकारण आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी साडेचार वर्षांपूर्वी भाजपशी अभद्र युती करुन सत्ता स्थापन करण्याचा मार्ग अवलंबिला. त्यामुळे सर्वाधिक जागा निवडून येऊन सुध्दा राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावे लागले. यानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करुन निवडणुका लढविल्या.
तर भाजपने सुध्दा काँग्रेस हा आमचा समविचारी पक्ष होऊच शकत नाही असे सांगितले होते. तर काँग्रेसच्या नेत्यांनी सुध्दा हाच सूर आवळला होता. काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी वेळोवेळी जि.प.तील अभद्र युती तोडू असे सांगितले होते.
मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतरही यावर कुठलाच निर्णय झाला नाही. त्यानंतर आता महाराष्ट्रातील राजकारणाला सुध्दा नवीन कलाटणी मिळाली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हे तीन्ही पक्ष एकत्र आले आहे.तर हाच फार्म्युला गोंदिया जि.प.तील अभद्र युतीसंदर्भात लागू करणार का? असा सवाल जिल्हावासीयांकडून उपस्थित केला जात आहे.

सहा महिन्यांसाठी काडीमोड घ्यायचा का?
गोंदिया जिल्हा परिषदेचा पाच वर्षांचा कार्यकाळ जुलै २०२० मध्ये पूर्ण होत आहे.त्यामुळे त्यापूर्वीच जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणे अपेक्षीत आहे. निवडणुकीसाठी सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने केवळ सहा महिन्यांसाठी अभद्र युती तोडायची का असा सुध्दा मतप्रवाह या दोन्ही पक्षात असल्याची माहिती आहे.

जिल्हा काँग्रेसमध्ये आता चलती कुणाची?
माजी आ.गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेसला रामराम ठोकत विधानसभा निवडणुकी दरम्यान भाजपमध्ये प्रवेश केला. जिल्ह्यातील काँग्रेसचे राजकारण हे त्यांच्याच अवतीभवती केंद्रीत होते. जिल्ह्यात काँग्रेस पक्षात त्यांचा शब्द अंतीम मानला जात होता. मात्र त्यांनी पक्षांतर केले असल्याने जिल्हा काँग्रेसमध्ये नेमकी चलती कुणाची प्रश्न उपस्थित केला जात आहे.
काँग्रेसचा गटनेता बदलणार
जिल्हा काँग्रेस कमिटीच्या दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या बैठकीत जि.प.तील भाजपसोबत असलेली अभद्र युती तोडण्यासंदर्भात निर्णय झाला. जि.प.चे नवीन गटनेते म्हणून पी.जी.कटरे यांची निवड करण्यात आली असून या संबंधीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.जिल्हाधिकाऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जि.प.तील अभद्र युती संपुष्टात येणार असल्याचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव अमर वºहाडे यांनी सांगितले.

Web Title: Who will decide to break the Alliance in ZP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.