विवेकानंद कॉलनीतील टाकी म्हणजे पांढरा हत्ती
By Admin | Updated: October 28, 2014 22:59 IST2014-10-28T22:59:00+5:302014-10-28T22:59:00+5:30
शहरवासीयांना २४ पिण्याचे पाणी पुरविणारी वाढीव पाणी पुरवठा योजना फसल्याचे चित्र आहे. शहरातील विवेकानंद कॉलनीत बांधकाम करण्यात आलेल्या टाकीचे बांधकाम पूर्ण होऊनही

विवेकानंद कॉलनीतील टाकी म्हणजे पांढरा हत्ती
गोंदिया : शहरवासीयांना २४ पिण्याचे पाणी पुरविणारी वाढीव पाणी पुरवठा योजना फसल्याचे चित्र आहे. शहरातील विवेकानंद कॉलनीत बांधकाम करण्यात आलेल्या टाकीचे बांधकाम पूर्ण होऊनही पाणी पुरवठा सुरू न झाल्याने ही टाकी फक्त पांढरा हत्ती वाटू लागली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधीकरणकडून तारीख पे तारीख दिली जाते मात्र पाणी पुरवठा सुरू न झाल्याने पाणी कधी मिलणार असा सवाल परिसरातील नागरिक करू लागले आहेत.
शहरवासीयांना २४ पिण्याचे पाणी पुरविण्याचे आश्वासन देत वाढीव पाणी पुरवठा योजनेचा गाजावाजा करण्यात आला. शहरातील विवेकानंद कॉलनीत या योजनेंतर्गत पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. ३१.३५ लख लिटर क्षमता असलेल्या टाकीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर या योजनेच्या पाईपलाईनसाठी परिसरातील चांगल्यात चांगले रस्ते खोदण्यात आले. विभागाकडून पाणी पुरवठा सुरू करण्याच्या नावावर तारीख पे तारीख दिली असून हा प्रकार मार्च महिन्यापासून सुरू आहे. वास्तवीक मात्र पाणी पुरवठा अद्याप सुरू झालेला नाही.
उन्हाळ््यात या योजनेच्या पाईप लाईनमधील लिकेज शोधण्याचे काम सुरू होते. त्यावेळीही अधिकाऱ्यांनी दहा-पंधरा दिवसांचा कालावधी सांगून वेळ मारून नेली. मात्र पाणी पुरवठा काही सुरू झाला नाही. आता उन्हाळाच काय पावसाळा संपून हिवाळा सुरू झाला आहे. मात्र विवेकानंद कॉलनीतील ही वाढीव पाणी पुरवठा योजनेची टाकी पांढरा हत्ती बनून उभी आहे.
शहरातल्या मामा चौक पासून पुढे विवेकानंद कॉलनी नव्याने तयार होत असलेल्या अन्य कॉलनींत नळ योजना नसल्याने बोअरचे पाणी येथील रहिवाशांना प्यावे लागते. बोअरच्या पाण्याची चव वेगळीच असून पाणी जड असल्याने पाणी पुरवठा आल्यास यापासून मुक्ती मिळणार अशी आशा येथील रहिवासी लाऊन बसले होते. मात्र विभागाकडून सुरू असलेली टोलवाटोलवी बघता आता नागरिकांच्या डोक्यावरून पाणी जात असून पाणी पुरवठा कधी सुरू होणार असा सवाल ते करीत आहेत. तर मजीप्राचे अधिकारी एक ना एक कारणं पुढे करून आपली बाजू सावरत असल्याचे दिसून येत आहे.
(शहर प्रतिनिधी)