महिलांचा संघर्ष केव्हा यशस्वी ठरणार?
By Admin | Updated: November 9, 2014 22:33 IST2014-11-09T22:33:34+5:302014-11-09T22:33:34+5:30
विदर्भ मत्स्यमार भोई महिला समाज समितीच्या वतीने गोरेगाव तालुक्याच्या कलपाथरी मध्यम प्रकल्पाला कंत्राटात देण्याची मागणी केली जात आहे. महिला तिथे मत्स्यबीज तयार करून

महिलांचा संघर्ष केव्हा यशस्वी ठरणार?
गोंदिया : विदर्भ मत्स्यमार भोई महिला समाज समितीच्या वतीने गोरेगाव तालुक्याच्या कलपाथरी मध्यम प्रकल्पाला कंत्राटात देण्याची मागणी केली जात आहे. महिला तिथे मत्स्यबीज तयार करून मत्स्यपालनाचा व्यवसाय करून इच्छितात. एवढेच नव्हे तर जवळच्या क्षेत्रात फलोत्पादन व धान तसेच गव्हाचा उत्पादन घेवूू घेवून आत्मनिर्भर बनू इच्छितात. परंतु त्यांच्या मागणीकडे वेळोवेळी दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे त्यांच्यात निराशेचे सावट पसरत आहे.
एका लिखीत तक्रारपत्रात विदर्भ मत्स्यमार भोई महिला समाज समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे की, सन २००९ मध्ये कलपाथरी मध्यम परियोजना बनविण्यात आली. समितीने सन २०११ मध्ये मध्यम परियोजना विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. परंतु त्या अधिकाऱ्याने अद्याप त्या दिशेने कसलेही पाऊल उचलले नाही. या संदर्भात लोकप्रतिनिधींनाही विनवनी करणे सुरू आहे. परंतु त्यांनीही अद्याप सतत दुर्लक्षच केले आहे. एकीकडे शासकीय अधिकारी या प्रकरणात ब्रसुद्धा काढत नाहीत, तर दुसरीकडे लोकप्रतिनिधी मौनावस्थेत आहेत. खा. नाना पटोले यांना निवेदन देवून याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. परंतु त्यांच्याकडूनही कसलेच सार्थक प्रयत्न करण्यात आले नाही. सन २००९ मध्ये तलाव बचाव कृती समितीच्या वतीने नागपूर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन काळात मोर्चा काढण्यात आला होता. त्या मोर्च्याचे नेतृत्व तत्कालिन आ. नाना पटोले यांनी केले होते. त्यावेळी स्वत: पटोले यांनी मासेमाऱ्यांना तलाव व जमीन देण्याची मागणी केली होती. परंतु नंतर त्यांना त्या घटनेचे विस्मरण झाल्याचे दिसून येत आहे.
महिलांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी तलावात मत्स्यबीज घातले होते. परंतु प्रशासनाची कार्यवाही त्यांच्याप्रति आताही थंडबस्त्यातच आहे. जिल्ह्यात अनेक जलाशय व तलावांचे बांधकाम शासनाने केले. परंतु एकही तलाव मत्स्यपालनासाठी महिलांना देण्यात आले नाही. त्यामुळे विदर्भ मत्स्यमार भोई महिला समाज समितीच्या आशा नैराश्येत बदलत आहेत. (प्रतिनिधी)