रेल्वे प्रशासन कधी येणार ट्रॅकवर ?
By Admin | Updated: January 5, 2015 23:06 IST2015-01-05T23:06:21+5:302015-01-05T23:06:21+5:30
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर ते बिलासपूर रेल्वे मार्गावर सर्वाधिक उत्पन्न देणारे रेल्वे स्थानक म्हणून गोंदियाची ओळख आहे. मात्र आवश्यक असणाऱ्या सुविधा या स्थानकावर नसल्याने

रेल्वे प्रशासन कधी येणार ट्रॅकवर ?
अपंग व वृद्धांची गैरसोय : सर्व कामे केवळ प्रस्तावितच
देवानंद शहारे - गोंदिया
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर ते बिलासपूर रेल्वे मार्गावर सर्वाधिक उत्पन्न देणारे रेल्वे स्थानक म्हणून गोंदियाची ओळख आहे. मात्र आवश्यक असणाऱ्या सुविधा या स्थानकावर नसल्याने प्रवाशांची मोठीच तारांबळ होते. दोन वर्षांपूर्वी बिलासपूर रेल्वे झोनचे तत्कालिन महाव्यवस्थापक अरूणेंद्रकुमार यांनी स्वयंचलित पायऱ्या (एस्कलेटर) व लिफ्टची सोय येथे करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. मात्र अद्यापही एस्कलेटर व लिफ्टची व्यवस्था करण्यात न आल्याने अपंग व वृद्धांची मोठीच हेळसांड होत आहे.
महाराष्ट्रासह मध्य प्रदेश व छत्तीसगडच्या प्रवाशांना गोंदिया रेल्वे स्थानकातूनच इतरत्र ये-जा करावी लागते. दररोज ६० पेक्षा अधिक प्रवाशी गाड्या या स्थानकातून धावतात. दररोज जवळपास २० हजार प्रवाशी येथे उतरतात व एवढेच प्रवाशी गाड्यांमध्ये चढतात. या स्थानकाचे विस्तारीकरण करण्यात आले. तीनऐवजी आता सात फलाटांवरून गाड्या धावतात. परंतु येथील तांत्रिक विकास व फलाटांचे सौंदर्यीकरण रखडले आहे. या बाबी केवळ प्रस्तावित असल्याचेच अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. स्थानकाच्या बाहेर चार वर्षांपूर्वी बहुपयोगी सुविधा केंद्र (मल्टी फंक्शनल कॉम्प्लेक्स) तयार करण्यात आले. त्यात प्रवाशांच्या सोयीसाठी व्यायसायीक प्रतिष्ठाने सुरू होणार होती.
मात्र या कॉम्प्लेक्सचे अद्याप लोकार्पण झाले नसून रेल्वेचे अधिकारीसुद्धा त्याबाबत ठामपणे काही सांगत नाही. येथे वृद्ध व अपंगाना एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर ये-जा करण्यासाठी स्वयंचलित पायऱ्यांची सुविधाही लांबतच आहे. त्यासाठी स्थानकाचे निरीक्षण व निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या. मात्र प्रत्यक्षात कामाला विलंब होत आहे.