ओव्हरलोड वाहतूक कधी बंद होणार?
By Admin | Updated: May 19, 2016 01:31 IST2016-05-19T01:31:18+5:302016-05-19T01:31:18+5:30
राष्ट्रीय महामार्ग-६ वरील शिरपूर येथील सीमा तपासणी नाका वाचवून ओव्हरलोड वाहतूक करण्यासाठी ट्रक मालकांनी ककोडी-चिचगड-देवरी मार्गाचा वापर केला आहे.

ओव्हरलोड वाहतूक कधी बंद होणार?
देवरी : राष्ट्रीय महामार्ग-६ वरील शिरपूर येथील सीमा तपासणी नाका वाचवून ओव्हरलोड वाहतूक करण्यासाठी ट्रक मालकांनी ककोडी-चिचगड-देवरी मार्गाचा वापर केला आहे. अनेक महिन्यांपासून दररोज दिवसरात्र हा प्रकार सर्रासपणे सुरू असून रस्त्याची पूर्णच वाट लागली आहे. शिवाय अपघातांची संख्यासुद्धा वाढल्याने सदर मार्गावरून ही ओव्हरलोड वाहतूक कधी बंद होणार? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे.
अवजड वाहने राष्ट्रीय महामार्ग-६ वरून न नेता देवरी-चिचगड-ककोडी मार्गावरून नेले जात आहे. त्यामुळे कित्येकांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे. ही वाहतूक बंद करण्याची मागणी नागरिकांनी वारंवार केली आहे. परंतु ओव्हरलोड ट्रकांची सातत्याने व सर्रासपणे ये-जा सुरूच आहे. त्यामुळे आता न्याय कोणाकडे मागावे, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
मागील दोन वर्षांपूर्वी शिरपूर येथे सीमा तपासणी नाका बनविण्यात आला आहे. तेथे प्रत्येक वाहनाचे वजन केले जाते. नियमापेक्षा अतिभार क्षमता असलेल्या वाहनांकडून दंड आकारला जातो. हा दंड वाचविण्याकरिता सुरूवातीला ट्रक मालक सिरपूर-मकरधोकडा या मार्गाचा वापर करीत असत. मात्र आता या मार्गाची दुर्दशा झाल्याने क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित करून या मार्गावर बॅरिकेट्स लावण्याची मागणी केली होती. तसेच प्रशासनानेही लगेच या मार्गावर व्हाईट बेरिकेट्स लावल्याने या मार्गावरील ओव्हरलोड वाहतूक पूर्णपणे बंद झाली.
यानंतर ट्रक चालकांनी ओव्हरलोड वाहनांकरिता ककोडी-चिचगड-देवरी या मार्गाचा वापर सुरू केला. आता या मार्गावर दिवसरात्र पोलिसांच्या सहकार्याने शेकडो ट्रक ये-जा करतात. त्यामुळे संपूर्ण मार्गावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत.
सामान्य रहदारीचा हा मार्ग आता धोकादायक झालेला आहे. कित्येकांना या मार्गावर अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी अनेकदा ही ओव्हरलोड वाहतूक बंद करण्याची मागणी केली आहे.
परंतु मागील सहा-सात महिन्यांपासून ओव्हरलोड वाहतूक पोलिसांच्या मदतीने सर्रासपणे सुरू आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष होत असल्यामुळे जनतेने न्याय कुणाकडे मागावे, असा प्रश्न नागरिकांसमोर उभा ठाकला आहे. आता या मार्गावरील ओव्हरलोड वाहतूक बंद होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. यावर पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)