केव्हा येणार गोरेगाववासीयांचे ‘अच्छे दिन’ ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 06:00 IST2019-09-16T06:00:00+5:302019-09-16T06:00:05+5:30
गेल्या एक वर्षापासून सदर रस्ता बांधकामाला सुरुवात झाली आहे. डांबरीकरणाचा रस्ता उखडल्यावर रस्त्यावर मुरुम टाकण्यात आले. मुरुमाची दबाई करण्यात आली. पुन्हा मुरुम काही जागेवरुन काढून परत दबाई करण्यात आली. एकच काम वारंवार झाले व त्यामुळे सदर रस्ता बांधकाम करताना नियोनजाचा अभाव दिसला.

केव्हा येणार गोरेगाववासीयांचे ‘अच्छे दिन’ ?
दिलीप चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : गोरेगाव-गोंदिया मार्गावर अच्छे दिनाचे स्वप्न पाहणाऱ्या जनतेला चांगले रस्ते तर मिळाले नाहीच त्याऐवजी चिखलातून ये-जा करण्याचे संकट अनुभवाला आले. आजघडीला रखडलेल्या गोरेगाव-गोंदिया राज्यमार्गाची दशा पाहण्यासारखी आहे. गेल्या १५ दिवसांपासून सदर रस्ता बांधकाम बंद असल्याची माहिती आहे.
गोरेगाव- गोंदिया रस्ता बांधकामाचे वेळोवेळी चुकलेले नियोजन आणि कंत्राटदाराचा बेजबाबदारपणा हेच सदर रस्ता रखडल्याचे कारण सांगितले जात आहे. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहे. विशेष म्हणजे, रहदारीस कच्चा रस्ता तयार करण्यात आल्यावर त्या रस्त्याची वेळोवेळी डागडुजी करणे बंधनकारक असताना गोरेगाव येथील पेट्रोल पंपाच्या पुढे पडलेले मोठमोठे भगदाड कंत्राटदाराच्या कार्यशैलीवरच प्रश्न चिन्ह निर्माण करणारे आहे.
गेल्या एक वर्षापासून सदर रस्ता बांधकामाला सुरुवात झाली आहे. डांबरीकरणाचा रस्ता उखडल्यावर रस्त्यावर मुरुम टाकण्यात आले. मुरुमाची दबाई करण्यात आली. पुन्हा मुरुम काही जागेवरुन काढून परत दबाई करण्यात आली. एकच काम वारंवार झाले व त्यामुळे सदर रस्ता बांधकाम करताना नियोनजाचा अभाव दिसला. रस्ता बांधकामाच्या वेळी बरेच वाहन रस्त्यावर अडकून अपघातही झाले. मात्र याची दखल कोणत्याही लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाने घेतलेली दिसत नाही.
जानाटोला- गोंदिया राज्यामहामार्ग सर्वात जास्त वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गावर शासकीय गाड्या, बस, मोटारसायकल २४ तास फिरकत असतात. पण रखडलेल्या रस्ता बांधकामामुळे या रस्त्यावर ये-जा करणाऱ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
अपघातात झाली वाढ
गोरेगाव-गोंदिया रस्ता बांधकामामुळे अनेक वाहनचालक त्रस्त असताना अनेकांचे वाहन अडकल्याचे चित्र आहे. अनेक वाहनचालकांना अडकलेल्या वाहनांना काढण्यासाठी क्रेनचा वापर करावा लागला. यात क्रेनने वाहन काढण्याचा खर्चाचा भुर्दंड वाहनचालकाला बसला. मात्र वाहन फसल्यामुळे मागे-पुढे राहणाºया वाहनांना तासनतास जागावे लागले, हे विशेष.
रस्ता झाला उंच
जानाटोला ते गोंदिया रस्त्याची उंची पूर्वी पेक्षा जास्त झाल्यामुळे अनेकांनी विरोध केला आहे. हिरडामाली, गोरेगाव, तुमखेडा येथील उंच रस्त्यामुळे अनेकांचे घर दबले व त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास पावसाळ्यात अडचण झाली. पुढे भविष्यात संपूर्ण रस्ता तयार झाला तर पाण्याची विल्हेवाट कशी होईल हा प्रश्न रस्त्यावर घर असणाºया घरमालकांना सतावताना दिसतो.
व्यवसाय बंद
रस्त्याचे बांधकाम सुरू झाल्यापासून व्यवसायावर अवकळा आली आहे. आता सवारी व्यवसायात दम उरलेला नाही. अलीकडेच सवारी गाडी सुरू केली, पण रस्त्यावरील खड्डे व चिखलामुळे गाडीत कुणी बसत नाही.
-जाफर साखरे, ऑटोचालक
एक वर्षापासून गाडी बंद
रस्त्याचे बांधकाम सुरू झाल्यापासून व्यवसायात आमच्या मंदी आली आहे. ऑटोत झटके लागत असल्यामुले प्रवासी गाडीत बसत नाही. त्यामुळे वर्षभरापासून गाडी बंद आहे.
- मनोज शेंडे, ऑटोचालक
शेतकऱ्यांच्या अडचणीत भर
उंच रस्ता बांधकामामुळे अनेक शेतकऱ्यांना शेतात जाने कठीण झाले. तीन ते पाच फूट उंचीच्या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीचे काम करण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे.