राजेश मुनीश्वरलोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आता वन्यप्राण्यांचा हैदोस वाढत असल्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. अशात प्राण्यांचा हैदोस थांबविण्यासाठी आता शासनाच्या माध्यमातून सौर कुंपणाची योजना आखण्यात आली आहे. मात्र, सौर कुंपन मिळत नसल्याने ते कधी मिळणार? असा सवाल शेतकरी करीत आहेत. तालुक्यातील शेंडा, पुतळी, बामणी, खडकी, दूग्गीपार, मंदीटोला, मोगरा ,राजगुडा, बकी, मेंडकी, कोलारगाव, कोसमघाट कनेरी, मनेरी, चिखली, खोबा, परसोडी परिसरातील वन्यजीव क्षेत्राला लागून असलेल्या शेतात आता वन्यप्राण्यांचा हैदोस दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. प्राण्यांच्या हैदोस थांबविण्यासाठी आता शासनाच्या माध्यमातून सौर कुंपणाची योजना आखण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शासनाच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण योजनेतून अनुदानावर सौर कुंपण देण्यात आले होते. सौर कुंपणच्या माध्यमातून वन्यप्राण्यांची रोकथाम करण्यात आली. पण ते सौर कुंपण आता निकामी झाल्यामुळे पुन्हा वन्यप्राण्यांचा हैदोस वाढत आहे.वन्यप्राण्यांमुळे होणारे शेतीचे नुकसान थांबविण्यासाठी कोकणा, कोसमघाट, बकी, मेंडकी परिसरात जंगलाला लागून जाळीचे कुंपण लावण्याची तितकीच गरज आहे. शेंडा सहवनक्षेत्रात जवळजवळ ३ किलोमीटरपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतीला लागून वनविभागाचे जंगल असल्यामुळे वन्यप्राणी शेतमालावर ताव मारताना दिसतात. वन्यप्राण्यांचा हैदोस खूप जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक होत नाही. पीक नुकसानीची भरपाई शासनाकडून अत्यल्प असल्यामुळे ते शेतकऱ्यांना परवडण्याजोगे नाही.सडक-अर्जुनी वनपरिक्षेत्र १८४०६ हेक्टर आहे. त्यात ७११४ हेक्टर क्षेत्र राखीव वन आहे. त्यापैकी काही परिसर हा शेतकऱ्यांच्या शेतीला लागून असल्यामुळे वन्यप्राणी शेतकऱ्यांचे नुकसान करतात.
ज्या शेतकऱ्यांना शासनाच्या नावीन्यपूर्ण योजनेतून सौर कुंपण पाहिजे आहे, त्यांनी वन विभागाकडे लेखी मागणी करावी. शासन अनुदानावर सौर कुंपण देण्याची योजना शासनाने केली आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घेऊन सौर कुंपण लावावे.सचिन डोंगरवार वनपरिक्षेत्र अधिकारी, वन्यजीव, नवेगावबांध
सडक-अर्जुनी वनपरिक्षेत्रात ज्या शेतकऱ्यांनी सौर कुंपण घेतले होते, त्यांनी आपल्या शेताला सुरक्षित ठेवण्यासाठी लावावे. जेणेकरून शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान होणार नाही. ज्या शेतकऱ्यांचे वन्यप्राण्यांमुळे नुकसान झाले आहे, त्यांनी संबंधित वनरक्षक व क्षेत्र सहायकांच्या सहकार्याने पीक नुकसानीचे दावे सादर करावे. त्यांना पीक नुकसानीची भरपाई शासनाच्या माध्यमातून दिली जात आहे.सुनील मडावी वनपरिक्षेत्र अधिकारी, सडक-अर्जुनी