पोलिसांकडूनच कोविड-१९ च्या नियमांचे उल्लंघन होते तेव्हा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:41 IST2021-02-26T04:41:49+5:302021-02-26T04:41:49+5:30
केशोरी : रस्ते अपघात टाळण्यासह कोरोनाचा संसर्ग वाढू नये, या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी केशोरी पोलिसांनी गावच्या दर्शनी भागात ...

पोलिसांकडूनच कोविड-१९ च्या नियमांचे उल्लंघन होते तेव्हा !
केशोरी : रस्ते अपघात टाळण्यासह कोरोनाचा संसर्ग वाढू नये, या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी केशोरी पोलिसांनी गावच्या दर्शनी भागात वाहन तपासणी पथक सुरू केले आहे. यामध्ये वाहनचालकांनी तोंडावर मास्क लावले आहे किंवा नाही, सिटबेल्ट लावले आहे का हे तपासण्यासाठी गाडी थांबवून पाहिले जाते. ज्या वाहनचालकांच्या तोंडाला मास्क लावले दिसत नाही. त्यांच्याकडून १०० रुपये पावती देवून दंड वसूल केला जातो. परंतु, तपासणी करणाऱ्या पोलिसांच्या तोंडावर मास्क लावल्याचे दिसून येत नाही.
पोलिसांकडूनच कोविड-१९ च्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येते. यावरून नियम आणि दंड केवळ सामान्यासाठीच का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नियंत्रणात आलेला कोरोना विषाणू पुन्हा डोके वर काढू पाहत असल्याने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविणे सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार केशोरी पोलिसांनी एक तपासणी पथक कार्यान्वित करुन गावाच्या प्रथमदर्शनी भागात उभे राहून वाहने तपासणी सुरू केले आहे. त्यात प्रामुख्याने दुचाकी वाहनचालकांनी हेल्मेट लावले किंवा नाही,गाडी चालविण्याचा परवाना आहे किंवा नाही आणि चारचाकी वाहनचालकांनी मास्क आणि सिटबेल्ट लावला आहे की नाही, हे पाहून वाहनांची तपासणी केली जाते. ज्यांनी या नियमांचे उल्लंघन केले त्यांच्याकडून १०० रुपये दंड वसूल करून पावती दिली जाते. इथपर्यंत ठीक आहे. परंतु स्थानिक लोकमत प्रतिनिधी प्रत्यक्ष रस्त्यावरुन जात असताना वाहन तपासणी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या तोंडावर मास्क लावले नव्हते.
.......
वरिष्ठ घेणार का दखल ?
पथक कोविड-१९ च्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कार्यवाही करीत आहे. तर आपण आपल्या तोंडावर मास्क लावण्याचे भान राहू नये याचे नवल वाटते. केवळ नियम पाळणे सामान्य जनतेसाठीच आहेत का? असा प्रश्न निर्माण होतो. केशोरी पोलिसांच्या पथकाकडून सर्रास कोविड-१९ च्या नियमांचे उल्लंघन होत आहे. वरिष्ठांनी याची दखल घेवून पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना मास्क लावण्याच्या सूचना निर्गमित करून समज देण्याची गरज आहे.