गोंदियाचे तापमान किती?
By Admin | Updated: March 27, 2015 00:33 IST2015-03-27T00:33:51+5:302015-03-27T00:33:51+5:30
उन्हाळा सुरू होऊन उकाडा वाढत आहे. पूर्वी जिल्ह्याचे तापमान मोजण्यासाठी शासकीय अधिकृत कार्यालय तहसील कार्यालय परिसरात होते.

गोंदियाचे तापमान किती?
गोंदिया : उन्हाळा सुरू होऊन उकाडा वाढत आहे. पूर्वी जिल्ह्याचे तापमान मोजण्यासाठी शासकीय अधिकृत कार्यालय तहसील कार्यालय परिसरात होते. मात्र ती इमारत पाडण्यात आल्याने तापमान मोजण्याची पर्यायी व्यवस्था कोठे करण्यात आली, याबाबत नागरिकांत तर्कवितर्क केले जात आहे.
मार्च महिन्यात सुरूवातीला अवकाळी पावसाच्या आगमनाने जिल्ह्यातील वातावरणात गारवा निर्माण झाला होता. याचा नागरिकांना व शेतकऱ्यांना फटका बसला असला तरी लोकांनी गारव्याचा अनुभव घेतला. मात्र मार्च महिन्याच्या उत्तरार्धात आता पुन्हा उष्णतेने परिणाम दाखविने सुरू केले. मात्र गोंदिया जिल्ह्याचे तापमान मोजण्याची सोय किंवा व्यवस्था कुठे करण्यात आली, याबाबत शासकीय अधिकाऱ्यांना माहिती नसल्याचे दिसून येते.
गोंदिया तहसील कार्यालय परिसरातून पूर्वी तापमानाची नोंद घेतली जात होती. त्याद्वारे जिल्ह्याचे तापमान नागरिकांना कळत होते. परंतु चार महिन्यांपूर्वी सदर इमारत पाडण्यात आली. मग तापमानाची अधिकृतपणे नोंद घेण्याची शासकीय व्यवस्था कुठे करण्यात आली, असे विचारल्यावर संबंधित अधिकारीच टाळाटाळीची उत्तरे देत आहेत. याचा अर्थ जिल्ह्याच्या तापमानाची नोंद कुठे होते, याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनाच नाही व चार महिन्यापासून जिल्ह्याचे तापमानच बेपत्ता आहे, असे होते. (प्रतिनिधी)