शासकीय नोकरी म्हणजे ‘वेठबिगारी’ आहे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 21:46 IST2019-07-30T21:45:32+5:302019-07-30T21:46:07+5:30
शासकीय नोकरी देताना जाचक अटी लावायच्या, सेवक प्रथा कंत्राटी नोकर अशा गोंडस नावाखाली तुटपुंज्या मानधनावर कर्मचाऱ्यांकडून सारी कामे करुन घ्यायची, अनेक नावाखाली त्यांच्या वेतनातून कपात करायची आणि कर्मचाऱ्यांचे बरे वाईट झाले तर हात वर करायचे म्हणजे शासन नोकरी देते की वेठबिगार समजून जुलूम करते, असा संतप्त सवाल मृत कर्मचाऱ्याच्या ७८ वर्षीय आई पदमीनबाई आरसुळे यांनी केला आहे.

शासकीय नोकरी म्हणजे ‘वेठबिगारी’ आहे काय?
लोकमत न्यूज नेटवर्क
वडेगाव : शासकीय नोकरी देताना जाचक अटी लावायच्या, सेवक प्रथा कंत्राटी नोकर अशा गोंडस नावाखाली तुटपुंज्या मानधनावर कर्मचाऱ्यांकडून सारी कामे करुन घ्यायची, अनेक नावाखाली त्यांच्या वेतनातून कपात करायची आणि कर्मचाऱ्यांचे बरे वाईट झाले तर हात वर करायचे म्हणजे शासन नोकरी देते की वेठबिगार समजून जुलूम करते, असा संतप्त सवाल मृत कर्मचाऱ्याच्या ७८ वर्षीय आई पदमीनबाई आरसुळे यांनी केला आहे.
कर्मचाºयांच्या जीवावर उठलेल्या अंशदायी पेन्शन योजनेच्या कचाट्यात सापडून मृत पावलेल्या कर्मचाºयांच्या कुटुंबाची व्यथा सांगताना त्यांनी लोकमत जवळ आपल्या अश्रूंना वाट मोकळी केली. गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील धमदीटोला शाळेत कार्यरत शिक्षक बालाजी तुकाराम आरसुळे यांचे २०१२ मध्ये अपघाती निधन झाले.वडिलांचे छत्र बालपणातच हरवल्यानंतर बालाजी आरसुळे यांनी अल्पवयातच कुटुंबांची जबाबदारी सांभाळत २२ व्या वर्षी शिक्षकाची नोकरी पत्करली. त्यातही तीन वर्षे तुटपुंज्या मानधनावर काम केले.२००९ ला सेवेत कायम झाले, पण २०१२ रोजी त्याचे दु:खद निधन झाले. घरी म्हातारी आई पदमीनबाई आरसुळे (७८), भाऊ गंगाधर व बहीण मनकरणाबाई असा परिवार आहे. कुटुंबाच्या जबाबदारी शिक्षक आरसुळे यांच्यावरच होती.त्यांचे पश्चात आई सावकारी कर्ज काढून दुसºया मुलाच्या मदतीने शेतात कापसाची पेरणी करते.पण अस्मानी संकटामुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर कायम आहे.लोक सेवानिवृत्त होऊन देवदर्शनाला जातात. तिथे वयोवृद्ध पदमीनबाई पोटासाठी मुलाला साथ देत शेतात राबत आहे.कर्ता मुलगा गमावला परंतु शासनाकडून याची कुठलीच दखल घेतल्या गेली नाही. ऐवढेच काय कर्मचारी आरसुळे यांच्या वेतनातून कपात झालेल्या डीसीपीएस, गटविमा व इतर रकमांचा आजवर हिशोब नाही. उतारवयात स्वत:च जीव सांभाळायचा की शासकीय कार्यालयाच्या येरझºया मारायच्या असा यक्षप्रश्न तिच्यापुढे उभा आहे.
कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन
वेठबिगार म्हणजे निराधार, दुर्बल, असंघटित व्यक्तीस योग्य मोबदला न देता राबवून घेणे त्या त्याकाळात त्यास इतरच काम करण्यास मनाई करणे,त्यास वेठीस धरुन बिगारासारखे काम करणे म्हणजे वेठ बिगार होय.भारतीय संविधान कलम २३ नुसार वेठ बिगारी बेकायदा ठरविण्यात आली असून वीस कलमी कार्यक्रमात वेठबिगार निर्मूलन व पुनर्वसनाचे निर्देश दिले आहेत.
कुटुंब निवृत्ती वेतन लागू करावे
शासकीय सेवेत असलेला मुलगा दगावल्यानंतरही शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.शासनाने याकडे लक्ष देवून वेतनातून कपात रक्कम व्याजासह द्यावी व कुटुंबीयांना कुटुंबनिवृत्ती वेतन लागू करावे.
-पदमीनबाई आरसुळे
मृत कर्मचाºयांची आई