आमगाव विधानसभेची परंपरा तुटेल काय ?
By Admin | Updated: May 15, 2014 01:29 IST2014-05-15T01:29:22+5:302014-05-15T01:29:22+5:30
येत्या १६मे रोजी १६ व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल येत आहेत. त्यापूर्वी अनेक चर्चांना उधाण आले आहे. यात सर्वात जास्त चर्चा आहे ती भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राची.

आमगाव विधानसभेची परंपरा तुटेल काय ?
विजय मानकर■ सालेकसा
येत्या १६मे रोजी १६ व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल येत आहेत. त्यापूर्वी अनेक चर्चांना उधाण आले आहे. यात सर्वात जास्त चर्चा आहे ती भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राची. कारण की या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहेत. या वेळची निवडणूक खूपच जास्त रंगली. त्यांचा सामना भाजपचे दिग्गज नाना पटोले सोबत झाला. नाना मैदानात आल्याने राजकारणातील कायदे पंडित सुद्धा संभ्रमात पडले कारण कोणीही पूर्ण विश्वासाने हे सांगू शकत नाही की भाईजी या निवडणुकीत सहज विजयी होतील. प्रत्येकाला आपल्या मनात थोडी फार शंका वाटत आहे.
त्यातही चर्चा करावयाची झाल्यास आमगाव विधानसभा क्षेत्र प्रफुल्ल पटेलांसाठी नेहमी पोषक ठरला आहे. आधी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात असलेला आमगाव विधानसभा क्षेत्र आता गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात सामिल करण्यात आला. तर पूर्वी चिमूर लोकसभा क्षेत्रात असलेला साकोली विधानसभा क्षेत्र भंडारा-गोंदिया क्षेत्रात समाविष्ट करण्यात आला. याचा फटका आज प्रफुल्ल पटेल यांना बसेल असे काही राजकीय वेिषकांना वाटत आहे. ज्या आधारावर ते आपले मत मांडतात यामध्ये मुख्य कारण म्हणजे, आजपर्यंत झालेल्या सर्व लोकसभा निवडणुकीत आमगाव विधानसभा क्षेत्रातून काँग्रेस आघाडीला मताधिक्य मिळाले आणि काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करण्यात नेहमी मोठी मदत मिळाली.
१९९१, १९९६ आणि १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत पटेल पंजा घेवून लढले व विजयी झाले. यात आमगावचा सिंहाचा वाटा राहीला.१९९६ च्या निवडणुकीत भाजपचे राम आस्वले हे भाईजींना चारही मुंड्या चित करतील असे वाटत होते. परंतु शेवटच्या क्षणी आमगाव क्षेत्राने बाजी पलटवून ठेवली होती. १९९८ मध्ये अटल बिहारी वाजपेयींच्या लाटेत नारायणदास सराफ भाईजींना पटकतील असे वाटत होते. परंतु त्यावेळी सुद्धा आमगाव क्षेत्राने भाईजींना भरभरुन प्रेम केले. सराफ यांची सारी शक्ती वाया गेली. त्यानंतरच्या काळात शरद पवार यांनी काँग्रेस सोडून आपली वेगळी चूल मांडली आणि त्यांचे सर्वात मोठे विश्वासु पटेल यांनी पंजा सोडून पवार यांची घड्याळ आपल्या हाताला बांधली.
१९९९ च्या लोकसभा निवडणुकीत भाईजी दुसर्यांदा आपली ताकद आजमावण्यासाठी चिमूरला गेले. परंतु या वेळीही ते बिस्तरबांधून परत आले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नावावर आपल्यासाठी मैदान तयार करायला सुरुवात केली आणि २00४ ला घड्याळ घेवून निवडणुकीत उतरले. काँग्रेस सोबत आघाडी असल्याने विजयी होण्याबाबत निश्चित होते. परंतु भाजपचे शिशुपाल पटले यांनी त्यांना पराभूत केले. त्यावेळी बसपाचे अजाब शास्त्री यांनी मत विभाजन करण्यात मोठी भूमिका बजावली होती. त्यामुळे भाईजी पराभूत झाले. तरी सुद्धा त्यावेळी आमगाव विधानसभा क्षेत्रात भाईजींना भरपूर साथ मिळाली.
त्यानंतर देशात लोकसभेचे परिसिमन झाले. नवीन मतदारसंघ पुनर्रचनेत आमगाव विधानसभा क्षेत्र गडचिरोली-चिमूर नावाने नव्याने अस्तित्वात आलेल्या लोकसभा मतदार संघात टाकण्यात आले. यावरून आमगाव क्षेत्राचे लोक कमालीचे नाराज झाले. आपल्याला भंडारा-गोंदियातच ठेवावे, अशी मागणी उठली. परंतु जे होणार होते तेच झाले.
२00९ च्या लोकसभा निवडणुकीत गडचिरोली-चिमूर क्षेत्रातून भाजपकडून गडचिरोली आमदार अशोक नेते तर काँग्रेसचे मारोतराव कोवासे यांना आपले उमेदवार जाहीर केले. नेते यांनी कोवासे यांना दोन वेळा गडचिरोली विधानसभा क्षेत्रात आमदारकीच्या निवडणुकीत पराभूत केले होते. त्यामुळे आपण कोवासे यांना लोकसभेत ही सहज पराभूत करु असा आत्मविश्वास होता. परंतु त्यांचा अति आत्मविश्वास त्यांच्यासाठी घातक ठरला. त्यांनी आमगाव विधानसभा क्षेत्राचा नीट अभ्यास केला नाही.त्यांना पूर्ण सहा विधान सभा क्षेत्र गडचिरोली सारखे वाटत होते.परंतु आमगाव क्षेत्राने त्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले व ते निवडणूक हरले. एकट्या आमगाव क्षेत्रातूनच कोवासे यांना १२ हजारांपेक्षा जास्त मतांची आघाडी मिळाली होती. येथील ८0 ते ९0 टक्के लोकांनी कोवासे यांचा चेहरा सुद्धा बघितला नव्हता. परंतु पंजाच्या नावावर भरभरुन मते मिळाली.