गुन्हेगारीवर वचक कुणाचा?
By Admin | Updated: August 5, 2015 01:56 IST2015-08-05T01:56:50+5:302015-08-05T01:56:50+5:30
तीन वर्षांपूर्वी गोंदिया जिल्ह्यात शासनाने काही ठिकाणी पोलीस चौक्या मंजूर झाल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते.

गुन्हेगारीवर वचक कुणाचा?
तीन वर्षे लोटले : मंजूर पोलीस चौकी अद्याप प्रलंबित
शेंडा-कोयलारी : तीन वर्षांपूर्वी गोंदिया जिल्ह्यात शासनाने काही ठिकाणी पोलीस चौक्या मंजूर झाल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. त्यात शेंडा येथे पोलीस चौकी मंजूर झाल्याचा मजकूरही होता. मात्र आता तीन वर्षांचा कालावधी लोटूनही सदर गावाला पोलीस चौकी मिळाली नाही. त्यामुळे परिसरात गुन्हेगारी व दहशत पसरविणाऱ्यांची संख्या वाढली असून त्यावर कुणाचाही वचक नसल्याचे दिसून येत आहे.
देवरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या शेंडा येथे पोलीस चौकी देण्यात यावी, यासाठी परिसरातील जनतेने प्रसार माध्यमांद्वारे वेळोवेळी शासनाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तरीही अद्याप पोलीस चौकी देण्यात आली नाही. सडक-अर्जुनीतील शेंडा, मसरामटोला, आपकारीटोला, कोयलारी, पांढरवानी, कोहळीपार, उशिखेडा, मोहघाटा, सालईटोला, पाटीलटोला, कन्हारपायली, प्रधानटोला, कोहळीटोला या आजूबाजूच्या खेड्यांचे शेंडा हे मुख्य गाव आहे. या परिसरात आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच सदर परिसर आदिवासीबहुल व नक्षल प्रभावित दुर्गम भागात मोडतो.
शहर असो किंवा गाव, प्रत्येक ठिकाणी दबंगगिरी, चोरी, डकेटी करणाऱ्या व क्षुल्लक कारणावरूं दहशत वाढविणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गावात शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त असणे गरजेचे झाले आहे.
शासनाने तीन वर्षांपूर्वी काही ठिकाणी पोलीस चौक्या मंजूर केल्याचे वृत्त होते. त्यात शेंडा येथे पोलीस चौकी मंजूर झाल्याचा उल्लेख होता. आता तीन वर्षे लोटले तरी या गावाला पोलीस चौकी मिळाली नाही, हे दुर्दैवच.
शेंडा गावावरून देवरी पोलीस ठाण्याचे अंतर २० किमी आहे. वेळी-अवेळी कोणतीही अप्रिय घटना घडल्यास साधनाअभावी वेळीच तक्रार करणे कठिण होते. अशातच चोरी करण्याऱ्यांचे अथवा गुन्हेगारांचे फावते व त्यांचे मनोबल वाढते.
या परिसरातील मुख्य ठिकाण असलेले शेंडा येथे पोलीस चौकी झाली तर चोऱ्या, डकेट्या, मारपीट यासारख्या घटनेत घट होईल व जनतेला संरक्षण प्राप्त होईल, यात तीळमात्र शंका नाही. तरी जनतेच्या हिताच्या दृष्टीने त्वरित शेंडा येथे पोलीस चौकी द्यावी, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. (वार्ताहर)