पकडायला गेले गांजा, हाती लागले २० लाख रोख अन् गांजा; स्थानिक गुन्हे शाखेची दर्जेदार कारवाई
By नरेश रहिले | Updated: May 26, 2025 20:14 IST2025-05-26T20:14:02+5:302025-05-26T20:14:23+5:30
फरार आरोपी उमेश याचा भाऊ घनश्याम अग्रवाल, त्याचे वडील मृतक हरिचंद अग्रवाल आणि इतर साथीदार १ यांच्याजवळून सन २०२१ मध्ये ७१ किलो गांजा किंमत ८ लाख ४३ हजार रुपयांचा जप्त करण्यात आला होता.

पकडायला गेले गांजा, हाती लागले २० लाख रोख अन् गांजा; स्थानिक गुन्हे शाखेची दर्जेदार कारवाई
नरेश रहिले
गोंदिया : रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कामठा येथील उमेश उर्फ करण हरिचंद अग्रवाल याच्या घरी धाड घालून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी स्कूल बॅगमध्ये विक्रीकरिता साठवून ठेवलेला ६०० ग्रॅम गांजा किंमत १२ हजार व ५०० रुपयांच्या ४ हजार नोटा (२० लाख रुपये) असा एकूण २० लाख १२ हजार ५०० रुपयांचा माल जप्त केला आहे.
पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात अवैधरित्या अमली पदार्थ गांजाची विक्री, वापर, साठा व वाहतूक करणाऱ्या विरुद्ध धाड कारवाई प्रभावी राबविण्याचे निर्देश सर्व ठाणेदारांना दिले आहेत. २५ मे रोजी वरिष्ठांच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कामठा येथे अमली पदार्थ गांजा बाळगणाऱ्याविरुद्ध कारवाई केली. फरार आरोपी उमेश उर्फ करण हरिचंद अग्रवाल (२५, रा. कामठा) हा पोलिसांची चाहूल लागताच पळून गेला. त्याची आई ललिता अग्रवाल यांच्या समक्ष घराची झडती घेतली असता, लोखंडी कपाटात एका निळ्या रंगाच्या स्कूल बॅगमध्ये विक्रीकरिता साठवून ठेवलेला ६०० ग्रॅम ओलसर, पाने, फुले, फळे, बिया मिश्रित गांजा किंमत १२ हजारांचा माल जप्त केला. गांजाच्याच बॅगमध्ये गांजा विक्रीच्या पैशातून साठवून ठेवलेली रक्कम ५०० रुपयांच्या ४ हजार नोटा एकूण २० लाख रुपये जप्त करण्यात आले. फरार आरोपी उमेश उर्फ करण हरिचंद अग्रवाल (२५, रा. कामठा) याच्याविरुद्ध पोलिस ठाणे रावणवाडी येथे पोलिस उपनिरीक्षक शरद सैदाणे यांच्या तक्रारीवरून एनडीपीएस कायद्याचे कलम ८ (क), २० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास वरिष्ठांचे निर्देश सूचनेप्रमाणे पोलिस ठाणे रावणवाडी पोलिस करीत आहेत.
२०२१ मध्ये पकडला होता ८.४३ लाखांचा गांजा
फरार आरोपी उमेश याचा भाऊ घनश्याम अग्रवाल, त्याचे वडील मृतक हरिचंद अग्रवाल आणि इतर साथीदार १ यांच्याजवळून सन २०२१ मध्ये ७१ किलो गांजा किंमत ८ लाख ४३ हजार रुपयांचा जप्त करण्यात आला होता. त्यांच्याविरुद्ध रावणवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
यांनी केली कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, महिला पोलिस उपनिरीक्षक वनिता सायकर, शरद सैदाने, हवालदार राजू मिश्रा, महेश मेहर, दुर्गेश तिवारी, सुजित हलमारे, सोमेंद्र तुरकर, संतोष केदार, कुमुद येरणे, घनश्याम कुंभलवार यांनी केली आहे.