स्वच्छता पालखीचे सडक अर्जुनीत स्वागत
By Admin | Updated: November 13, 2016 01:26 IST2016-11-13T01:26:37+5:302016-11-13T01:26:37+5:30
स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी २ आॅक्टोबरपासून राज्य भ्रमंतीवर निघालेल्या संत गाडगे महाराज ...

स्वच्छता पालखीचे सडक अर्जुनीत स्वागत
आमदार आदर्श ग्राम कनेरी : डव्वासह १२ गावात पालखीचे भ्रमण
सडक-अर्जुनी : स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी २ आॅक्टोबरपासून राज्य भ्रमंतीवर निघालेल्या संत गाडगे महाराज यांची स्वच्छता पालखी जिल्ह्यात वडसा मार्गे अर्जुनी-मोरगाव येथे ८ नोव्हेंबर रोजी दाखल झाली. सदर स्वच्छता पालखी ९ नोव्हेंबर रोजी सडक-अर्जुनी तालुक्यातील खोबा येथे दाखल झाली असता सहायक गटविकास अधिकारी टेंभरे व अर्जुनी-मोरगावचे सहायक गटविकास अधिकारी मयूर आंदेलवाड यांनी हिरवी झेंडी दाखवून श्रीफळ देवून पालखीचे स्वागत केले.
जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख, विस्तार अधिकारी अनूप भावे, स्वच्छता विभागाचे सूर्यकांत रहमतकर, तालुका संपर्क अधिकारी भागचंद्र रहांगडाले, राजेश उखळकर, देवानंद बोपचे, गटसमन्वयक राधेशाम राऊत, भूमेश्वर साखरे, पौर्णिमा उईके, खोबा येथील ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते.
स्वच्छता अभियानाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागातर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ आॅक्टोबरपासून ही पालखी महाराष्ट्र भर फिरून स्वच्छता संदेश देत आहे. स्वच्छतेचे प्रणेते संत गाडगेबाबा यांनी ज्या गाडीतून गावोगावी जावून ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्व पटवून देत त्या गाडीचे पालखीत रुपांतर करण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यात ही पालखी मार्गक्रमण करून स्वच्छतेबाबत जनजागृती करीत आहे. दरम्यान सडक-अर्जुनी तालुक्यातील खोबा येथे सर्वप्रथम पालखीचे आगमन झाल्यावर थाटात स्वागत करण्यात आले. सदर पालखीचे कोकणा/जमी., आमदार आदर्श ग्राम कनेरी/राम, चिखली, कोहमारा मार्गे वडेगाव, परसोडी, खजरी, डव्वा, पळसगाव, भुसारीटोला, पाटेकुर्रा या मार्गे गोरेगाव तालुक्यात प्रस्थान झाले. कोकणा व कनेरी येथे ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकऱ्यांच्या उपस्थितीत संपूर्ण गावात पालखी रथाचे भ्रमण करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)